अमरावतीत नर्गिस अली यांना सर सय्यद पुरस्कार
सामाजिक आणि साहित्यिक योगदानाची मोठी दखल

* गरजू महिलांसाठी कार्य अत्यंत मोलाचे
अमरावती/24एप्रिल- शहरातील प्रसिद्ध समाजसेविका आणि शायरा नर्गिस अली यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक आणि साहित्यिक कार्यासाठी सर सय्यद अहमद खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. नर्गिस अली या ‘महक फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजातील परितक्त्या, विधवा आणि गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनवत आहेत. त्या दरमहा सुमारे 200 ते 250 महिलांना काम देऊन त्यांना आधार देत आहेत. याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांच्या मदतीसाठीही त्या सदैव तत्पर असतात. समाजसेवेसोबतच त्या एक उत्तम शायरा म्हणूनही परिचित आहेत. सप्तरंगी हिंदी साहित्य संस्थेच्या त्या सक्रिय सदस्य आणि अहसास संस्थेच्या सचिव आहेत. त्यांच्या कविता सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते.




