अन्न-धान्य पुरवठा सेवा अधिक सुलभ करण्यासाठी कटिबध्द

आ. संजय खोडके यांचे प्रतिपादन, लाभार्थ्यांना राशन कार्डचे वाटप, शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती/27 जुलै- सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी अन्न-धान्य पुरवठा सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषद आमदार – संजय खोडके यांनी केले.
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या उपक्रमांतर्गत अमरावती शहरातील अरकान कॉलनी येथील युसूफ पॅलेस मध्ये आयोजित राशन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नवीन राशन कार्ड काढणे, नाव दुरुस्ती व नाव समाविष्ट करणे, दुय्यम राशन कार्ड बनविणे,अशी राशन कार्ड संबधी कामे करण्यात आली. तसेच नागरिकांना राशन कार्डचे वाटप सुद्धा करण्यात आले. शिबिराप्रसंगी अमरावती शहरी अन्न पुरवठा वितरण अधिकारी- प्रवीण राऊत, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष – यश खोडके, मनपा स्थायी समिती सभापती – अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष – प्रशांत डवरे, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष – अँड. शोएब खान, सनाउल्लाखान ठेकेदार, नदीमुल्ला सर, बबलू अंपायर, आदींसह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. संजय खोडके यांनी सांगितले की, शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचणे ही शासनाची व एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. नागरिकांना राशन कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन प्रभावी माध्यम ठरत असून भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यादरम्यान या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत विविध सेवांचा लाभ घेतला. दरम्यान शिबीर स्थळी एस.टी. बस सवलत स्मार्ट कार्ड संदर्भातील एन.सी.एम. सी. कार्ड काढण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याने स्थानिक भागातील महिला व जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा यथायोग्य लाभ घेतला.

संबंधित बातम्या

Back to top button