युवा व्यापार्याने घातला 5 कोटींचा गंडा
अमरावती बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी आर्थिक संकटात

दलाल अडत्यांचे तोंडचे पाणी पळाले
अमरावती/27 जुलै– कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन आणि तूर व्यापारात 5 कोटी रुपयांची देणी न देता एका युवा व्यापार्याने अचानक हातवर केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बाजारात यंदा सोयाबीनचे भाव 7 हजार रुपयांच्या पलीकडे गेल्यामुळे आणखी तेजी येईल या अपेक्षेने अनेक शेतकरी आणि दलालांनी आपला माल रोखून धरला होता. मात्र ऐन मोक्यावर संबंधित व्यापार्याने शेतकर्यांकडून व इतर दलालांकडून मोठ्या प्रमाणावर माल उचलूनही ठरलेल्या वेळेत कोणतीही रक्कम दिली नाही. तो अचानक बाजार समितीत येणे बंद करून भूमिगत झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि अडत बाजारात तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून या युवा व्यापार्याच्या आर्थिक व्यवहारा बाबत बाजारात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हा आकडा दोन ते तीन कोटींचा असल्याचा दावा करत होते तर काहींनी हा घोटाळा 5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे स्पष्ट केले. बर्याच दिवसांनंतर हा व्यापारी सोमवारी अचानक बाजार समितीत आल्याची कुणकुण लागताच, ज्यांची रक्कम अडकली होती त्या सर्व संतापलेल्या शेतकरी, अडते आणि दलाल यांनी त्याला तात्काळ घेराव घातला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बाजार समितीत एकच तारांबळ उडाली आणि वातावरण चांगलेच तापले.बाजार समितीमध्ये प्रकरण चिघळल्याचे लक्षात येताच तातडीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत संबंधित व्यापार्याला आणि नुकसान झालेल्या सर्व घटकांना समोरासमोर बसवून हा गुंता सोडवण्याचेआणि देण्याघेण्याचा तिढा मार्गस्थ लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाले आहेत. मात्र या संपूर्ण घटनेमुळे ऐन हंगामात शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला असून, अशा प्रकारच्या व्यापार्यांच्या विश्वासघातामुळे ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने या प्रकरणी कसूर करणार्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व शेतकरी व दलालांचे पैसे तातडीने परत मिळवून द्यावेत, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.




