किचन मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल

धारणीतील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे प्रशासनाला कडक निर्देश

मंत्री डॉ.अशोक उईके यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

अमरावती /27 जुलै- जिल्ह्यातील धारणी येथील शासकीय आश्रमशाळेत शनिवारी रात्री साडेसात वाजता जेवणातून 69 विद्यार्थी-विद्यार्थिनींना गंभीर विषबाधा प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक निलेश भागवत यांच्या तक्रारीवरून मुख्य स्वयंपाक घराचे मालक विजय सदाशिव बोथरे, प्रतिनिधी सचिन किसन सातपुते, स्वयंपाकी संदीप सिंग, सोबती महेश देसाई आणि आमेकर अशा सहा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण मेळघाट परिसर हादरून गेला असून पोलिसांनी आरोपींवर कठोर पावले उचलल्यामुळे हलकल्लोळ उडाला आहे.
शनिवारी रात्री आश्रमशाळेत जेवण केल्यानंतर अचानक 50 मुली आणि 19 मुलांना उलट्या अन् जुलाब सुरू झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. मुलांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवून विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी मदत केली तसेच विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, फळे आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली. डॉक्टर व कर्मचार्‍यांची वानवा भासू नये म्हणून उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त आरोग्य कर्मचारी सुद्धा तातडीने दाखल करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गीते यांनी धारणीमध्येच मुक्काम ठोकून संपूर्ण प्रकरणाची कसून व सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उच्च अधिकार्‍यांना तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासर्व घटनेवर बारीक नजर ठेवून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा येथील शासकीय आश्रमशाळेत सुद्धा रविवारी विषबाधेच्या तीन नवीन घटना समोर आल्यामुळे यंत्रणा आणखी सतर्क झाली असून वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्व मुले सुखरूप असल्याची व त्यांची प्रकृती आता उत्तम सुधारल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढवून कसून तपास सुरू ठेवला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button