तुकाराम मुंढे यांचे पुढचे टार्गेट भेसळयुक्त दारू

दारुमध्ये 60% हून अधिक असल्याचे उघडकीस

मुंबई/2 सप्टेंबर  : निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि औषधांवर कडक कारवाई केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा न्युट्रास्युटिकल्स म्हणजेच प्रोटिन पावडर आदी पोषणविषयक औषधे आणि दारूतील भेसळीकडे वळवला आहे.
इंडियन एक्स्प्रेस आयोजित आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात आज तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली. न्युट्रासिटिकल्सच्या संदर्भात त्यातील घटक, लेबल, त्यासंदर्भात केले जाणारे दावे, प्रिस्क्रिप्शन शिवाय होणारी विक्री आदी सर्व बाबींची पडताळणी एफडीएतर्फे सुरू असून येत्या काही दिवसांत त्या संदर्भातील कारवाईला सुरुवात होईल.
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे आणि त्या संदर्भात जनजागृती व्हावी हेच या कारवाईमागचे प्रमुख हेतू आहेत. खरे तर या संदर्भातील कायदे 2006 आणि 2011 साली अस्तित्वात आले आहेत. आता त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर यापूर्वीही इथल्या अन्न आणि औषध प्रशासनाने चांगली कामगिरी केली होती, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
यापूर्वी वेगवेगळ्या वयोगटाशी संबंधित खाद्यपदार्थांच्या संदर्भात कारवाई करण्यात आली. नवजात बालकांसाठी म्हणून बाजारात मिळणारे अन्न, त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठीचे अन्न त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊन कारवाई केली. राज्यातील अनेक कारवाईंची दखल केंद्रीय पातळीवरही घेण्यात आली आणि तसे आदेश केंद्रीय यंत्रणांकडून जारीही झाले.आता तरुण वर्गाकडे एफडीएने मोर्चा वळवला असून, येणार्‍या काळात तरुण वर्गाकडून पसंती मिळालेल्या खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कारवाईला सुरुवात होईल. निकृष्ट खाद्यपदार्थांचा परिणाम हा काही केवळ शरीरावर होत नाही, तर आपल्या उत्पादकतेवर आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही (जीडीपी) होत असतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाचीच आहे, असेही मुंढे म्हणाले.

Back to top button