समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात ठार; 21 जखमी

धामणगाव रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री धावपळ
मंगरूळ दस्तगीर हद्दीतील चॅनेल क्रमांक 97 जवळील भीषण घटना
धामणगाव रेल्वे/2 ऑक्टोबर – समृद्धी महामार्गावरील तळणी गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रकने भाविकांच्या बोलेरो वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून एकवीस जण जखमी झाले आहेत. वर्ध्यातील रामनगर सोमनाथ ले-आऊट येथील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे कार्यकर्ते शेगाववरून दुर्गेची मूर्ती वाहनातून घेऊन गावाकडे परतत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ बचावकार्य हाती घेतले.
वर्ध्यातील रामनगर परिसरातील सोमनाथे ले-आऊट येथील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे भाविक शेगाववरून दुर्गा मातेची मूर्ती घेऊन एमएच 05 बीएच 5793 क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाला जोडलेली ट्रॉली घेऊन समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे निघाले होते. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी गावाजवळ चॅनेल क्रमांक 97 जवळ पाठीमागून भरधाव आलेल्या सीजी 07 सीजे 8855 क्रमांकाच्या ट्रकचालकाने बेफिकीरपणे वाहन चालवून बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती कीबोलेरो वाहन रस्त्यावर उलटून अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले. घटनेनंतर महामार्गावर नागरिकांची गर्दी जमली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी व कर्मचार्यांनी तात्काळ उपचार सुरू केले.
अपघाताची बातमी समजताच धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे यांनी मध्यरात्री दोन वाजताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी सावंगी मेघे व सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात आले. सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या सातवर पोहोचली असून सणासुदीच्या तोंडावर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील, पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष ताथोड व उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनीही घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांचे सांत्वन केले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पाच जणांचे धामणगावात शवविच्छेदन पूर्ण-अपघातातील पाच मृतांचे शवविच्छेदन धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी एक वाजता पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सावंगी मेघे येथे उपचार घेत असताना दगावलेल्या दोघांचे शवविच्छेदन तेथील रुग्णालयात करण्यात आले. इतर सर्व गंभीर जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून प्रशासनाकडून स्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
वर्ध्यात मृतकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
दुर्गोत्सवाचे नऊ दिवस आईच्या सेवेत घालण्याचा निर्धार करून शेगाव येथुन दुर्गामातेला आणण्यासाठी निघालेल्या माताभक्तांवर काळाने घाला घातला. एकाच परिसरातील 7 जणांच्या मृत्यूने सोमनाथे लेआऊटमध्ये आज चुल पेटली नाही. दुपाली अडीचनंतर दर अर्ध्या तासाच्या अंतरात 7 जणांची अन्त्ययात्रा निघाली. स्थानिक स्मशानभूमीत 7 जणांना अन्त्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयातून घरी शेवटचे दर्शन आणि प्रेतयात्रा अन्त्यसंस्कारासाठी निघाताना मोहल्ल्यातच आक्रोश पाहायाला मिळाला.स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सकाळीच मृतकाच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
सर्व मृत व जखमी वर्ध्याचे रहिवासी
दत्ता कुरसंगे, घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू उर्फ सचिन बादलमवार, ओम गावंडे, रोशन राऊत व आणखी एक असे सात भाविक मृत पावले. जखमींमध्ये दिनेश रामकृष्ण पोहनकर, नरेंद्र प्रल्हादराव सयाम, मुनेश्वर देवराव ढोले, सागर मुनेश्वर ढोले, सतीश वसंतराव राऊत, सतीश पांडुरंग खाडे, अनिल मारोतराव मसराम, दिनेश पांडुरंग नानवटे, नयन सुधीर खानझोडे, यश रवी मलकापुरे, अमित अनिल आडे, प्रतीक रामदास सिरसकर, अनूज अनिल आडे, दुर्गेश यशवंत बिसेन, आर्यन प्रभाकर वैद्य, शुभम श्यामसुंदर ढबाले, प्रणय प्रभाकर ढोले यांचा समावेश आहे.
फरार ट्रकचालकास पोलिसांनी केली अटक
धडक दिल्यानंतर आरोपी ट्रकचालक वाहन तिथेच सोडून पळून गेला. मंगरूळ दस्तगीर व दत्तापूर पोलिसांसह वाहतूक शाखेचे पथक चालकाचा शोध घेत होते. त्यातच पोलिसांनी शिताफीने ट्रकचालकाला ताब्यात घेवून अटक केली.पुढील कारवाई पोलीस करीत आहे.





