विद्यार्थीनीवर चाकूने प्राणघातक हल्ला, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा

उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी, पोलीस आयुक्तांना दिले निवेदन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी

अमरावती /2 ऑक्टोबर – बडनेरा येथील राम मेघे फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर चाकूने झालेल्या हल्ल्याच्या घटनेने शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपी नवीन वनवाणी याच्यावर कठोर कारवाई करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा द्यावी, तसेच शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये महिला पोलिसांचे दामिनी पथक तैनात करावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या 3 महिन्यांत विद्यार्थिनींवरील हल्ल्याच्या 3 घटना समोर आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. महाविद्यालय परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात पोलिसांची गस्त वाढवून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. आरोपीविरुद्ध तातडीने कठोर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. दरम्यान, माजी खासदार अनंत गुढे यांनी शहरातील रुग्णालयात जाऊन हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीची भेट घेतली. त्यांनी डॉ. श्याम राठी यांच्याकडून तिच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार अनंत गुढे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर, नगरसेवक प्रकाश मारोटकर, बालासाहेब भागवत, रामा सोलंके, बालासाहेब राणे, प्रमोद कोहले, नितीन हटवार, संजय सावडे, गजानन सानप, माधव पुंजसे, तनय चोपकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button