महाराजस्व अभियानात महिलांना मिळाले जमिनीचे हक्क
राज्यात सहा दिवसांत साडे चार लाख नागरिकांनी घेतला सेवा, योजनांचा लाभ

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई/27 जुलै-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्यावतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यात सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामध्ये पहिल्या सहा दिवसांत राज्यात 3 हजार 436 महिलांची नावे ‘महिला शेतकरी’ म्हणून नोंद करण्यात आली. महसूल विभागाचे हे क्रांतिकारी पाऊल आहे.
यामध्ये, सर्वाधिक 1219 महिला शेतकर्यांची नोंद नागपूर विभागात करण्यात आली असून 2 ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. या अभियानामध्ये अतिशय उत्साहात महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.
22 जुलैपासून सुरू झालेल्या या अभियानात पहिल्या सहा दिवसांत, आज सोमवारपर्यंत राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित शिबिरांमधून तब्बल चार लाख 35 हजार 209 नागरिकांनी विविध महसुली सेवा आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. 2 ऑगस्टपर्यंत हे अभियान राज्यभरात सुरु राहणार असून, राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी या अभियानात सकारात्मक सहभाग देत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या राज्यस्तरीय अभियानाने जनसेवेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या अभियानादरम्यान राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील विविध घटकांसाठी महसूल विभागाकडून कल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. 15 प्रकारच्या महसुली सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. महिलांना जमिनीचे हक्क मिळवून देत शेतकरी दर्जा देण्याच्या निर्णयांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 1,067 महिलांच्या नावे नोंदी करण्यात आल्या. तर गडचिरोलीमध्ये 75, भंडारा येथे 39 आणि चंद्रपूर येथे 38 महिलांना शेतकरी दर्जा प्रदान करण्यात आला. तसेच गावठाणातील नागरिकांना जमिनीची मालकी देणार्या ’स्वामित्व सनद’ वाटप कार्यक्रमात नागपूर येथे 426, अमरावती येथे 368, अकोला येथे 294 आणि गोंदियामध्ये 153 नागरिकांना सनदीचे वाटप करण्यात आले. शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या ’मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’अंतर्गत अकोला जिल्ह्यात तब्बल 2,797 रस्त्यांचे वाद मिटवून शेत रस्ते मोकळे करण्यात आले. त्यासोबतच गोंदियामध्ये 422, नागपूर येथे 165, भंडारा येथे 145 आणि चंद्रपूर येथे 92 पाणंद रस्ते शेतकर्यांसाठी खुले करण्यात आले. याशिवाय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद करत चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 9,616, गोंदियामध्ये 1,629 आणि कोल्हापूर येथे 519 लाभार्थ्यांना थेट सहाय्य पुरवण्यात आले. शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या कामात चंद्रपूरमध्ये 617, गोंदियामध्ये 504 आणि नागपूरमध्ये 536 कुटुंबांना दिलासा देण्यात आला.सातबारा अद्ययावतीकरणासाठी राबवण्यात आलेल्या जिवंत सातबारा मोहिमेत सातारामध्ये 2,733, बुलढाण्यामध्ये 1,460, अमरावतीमध्ये 660, नागपूरमध्ये 652 आणि सांगलीत 543 शेतकर्यांचे महसुली प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले.जिल्हा व विभागनिहाय एकूण आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात 15,843, कोल्हापूरमध्ये 14,289, सातारामध्ये 14,189, चंद्रपूरमध्ये 12,701, अमरावतीमध्ये 12,057, गोंदियामध्ये 11,155, पुण्यात 10,438 आणि अकोल्यामध्ये 8,862 लाभार्थ्यांनी या मोहिमेचा थेट लाभ घेतला असून संपूर्ण पुणे विभागाची एकत्रित संख्या 66,200 वर पोहोचली आहे. अशाप्रकारे संपूर्ण राज्यात एकूण 2 लाख 39 हजार 744 लाभार्थी या अभियानाशी जोडले गेले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात महसूल विभाग राज्यभरात अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि वेगवान सेवा देण्यासाठी निरंतर कटिबद्ध राहील. या मतदारसंघातील आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यांचे आभार मानतो. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री




