शंभरी गाठणार्‍या इर्विनची दयनीय अवस्था

अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत जीर्ण

पावसाळ्यात छत गळती अन् भिंती कोसळण्याची भीती

अमरावती/24 एप्रिल- शहराच्या मध्यवर्ती भागात गरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे जिल्हा सामान्य रुग्णालय आज स्वतःच आजारी असल्याचे चित्र दिसत आहे. ब्रिटिश काळात उभारलेली ही ऐतिहासिक वास्तू आता शंभरीकडे वाटचाल करत असताना, तिच्या भिंती आणि स्लॅब अत्यंत कमकुवत झाले आहेत. पावसाळ्यात छतावरून पाणी गळती होत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, भिंतींचे पापुद्रे निघून ते कधीही कोसळतील अशी भीती व्यक्त होत आहे. बाहेरून रंगरंगोटी आणि चकचकीत फरशा लावून इमारत सुंदर दिसत असली, तरी आतील मूळ सांगाडा मात्र चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे.
सन 1928 मध्ये स्थापन झालेले हे रुग्णालय 2028 मध्ये शताब्दी साजरी करेल. शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर असूनही आजही लाखो रुग्णांना हे रुग्णालय सेवा देत आहे. जुन्या आणि नव्या इमारतींच्या या संकुलात सध्या 1 ते 17 क्रमांकाचे कक्ष कार्यरत आहेत. दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू असून अधिकच्या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सध्या नाले, रस्ते आणि भिंतींच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
रुग्णालयात औषधोपचार, शस्त्रक्रिया, बालरोग अतिदक्षता विभाग आणि नेत्र विभाग अशा विविध सुविधा असल्या, तरी आधुनिक तांत्रिक साधने, डॉक्टर आणि परिचारिका यांची मोठी कमतरता भासत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या सुविधा अपुर्‍या पडत आहेत. परिसरात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात, तर 300 ते 400 रुग्णांना भरती केले जाते. रुग्णांसोबत येणार्‍या नातेवाईकांची मोठी गर्दी, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणारे नागरिक आणि वाहनांची कोंडी यामुळे रुग्णालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. 28 जुलै 1928 रोजी या रुग्णालयाची स्थापना झाली होती. तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. ब्रिटिशकालीन आरोग्य व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा भाग आजही जिल्ह्यातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र म्हणून ओळखला जातो. ग्रामीण आणि शहरी भागातील गोरगरीब जनतेसाठी हे रुग्णालय जीवनवाहिनी ठरले आहे. मोफत आणि अल्प दरात उपचार मिळत असल्याने लाखो लोकांसाठी हे हक्काचे ठिकाण आहे. शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक वास्तूचे जतन करून तिचा सर्वांगीण विकास करणे आता काळाची गरज बनली आहे.

वारशाचे जतन आणि सुसज्ज आरोग्यसेवा

ब्रटीशकालीन इर्विन रुग्णालयाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना या ऐतिहासिक वास्तूचे वैभव टिकवणे गरजेचे आहे. केवळ डागडुजी न करता इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता डॉक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीची कमतरता तातडीने भरून काढल्यास सामान्य माणसाला अधिक दर्जेदार उपचार मिळतील.

संबंधित बातम्या

Back to top button