अमरावतीत विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन
एक लाख रोख बक्षिसांची मोठी लयलूट

25 पर्यंत नोंदणीची शेवटची संधी
अमरावती/24एप्रिल-अमरावतीत 26 एप्रिल रोजी विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय व स्व. अनंत पंजाबराव देशमुख स्मृती जलतरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विदर्भातील जलतरणपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेत अंडर 10, 12 व 15 अशा तीन वयोगटांत खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना एक लाख रुपयांची रोख बक्षिसे, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त तीन स्पर्धांत सहभागाची मुभा दिली आहे. आतापर्यंत 120 जलतरणपटूंनी आपली नावनोंदणी पूर्ण केली आहे. खेळाडूंचा वाढता उत्साह पाहता आयोजकांनी नोंदणीची मुदत 25 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
स्पर्धेचे आयोजन संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले व प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांच्या पुढाकाराने होत आहे. या विदर्भस्तरीय स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून जास्तीत जास्त जलतरणपटूंनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. इच्छुक खेळाडूंनी नोंदणीसाठी प्रा. सौरभ काळमेघ (9518945884) व राजेश जोंधळे (9307383491) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.




