ग्राहक हक्कांसाठी अमरावती सज्ज

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेची महानगर कार्यकारिणी नियुक्त

अमरावती/24 एप्रिल- अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, अमरावती महानगर कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 16 एप्रिल 2016 रोजी श्री संत नरहरी मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. राज्य अध्यक्ष श्री गजानन मुदगल, राज्य कार्याध्यक्ष श्री निलेश टवलारे व राज्य सचिव अ‍ॅड. प्रभाकर वानखडे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडून नव्या कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीत नव्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र व माय-कार्ड प्रदान करण्यात आले तसेच त्यांच्या जबाबदार्‍यांची सोपवणूक करण्यात आली. महानगर अध्यक्ष म्हणून रोहन ढोमणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणीची रचना करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून श्री हर्षद बोबडे, महानगर सेक्रेटरी म्हणून श्री अभिजीत काळे, महानगर कार्याध्यक्ष म्हणून श्री ऋषिकेश तेलकर, महानगर संघटक म्हणून श्री अविनाश पुनसे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून श्री मनोज सावरकर व श्री केवल बंग यांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर बडनेरा अध्यक्ष म्हणून श्री संजय बीसने(संस्थापक – स्वराज्य ढोल पथक), महिला विंगमध्ये सौ. अर्चना मावळे (झोन अध्यक्ष, बडनेरा – अमरावती) आणि वरुड तालुका अध्यक्ष म्हणून श्री तुषार डांगोरे यांचीही नियुक्ती करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष रोहन ढोमणे यांनी अमरावतीमध्ये ग्राहक संरक्षण मिशन राबविण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त करत ग्राहकांच्या विविध समस्यांवर ठोस भूमिका मांडली. बँकांकडून होणारी जबरन वसुली, रुग्णालयांमधील वाढीव व अवाजवी बिलिंग, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या बेकायदेशीर पद्धतीने काम करणार्‍या काही बँक वसुली पथकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला. ग्राहकांवर अन्याय करणार्‍यांविरोधात कायदेशीर मार्गाने ठोस कारवाई करून त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीत ग्राहक हक्क संरक्षण, जनजागृती अभियान, तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button