सोनिया गांधींचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर
वर्षभरात बायोपिक पूर्ण करण्याचे नियोजन

नवी दिल्ली /13 नोव्हेंबर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आयुष्यावर आता बायोपिक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष टी. जयप्रकाश रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सोनिया गांधी यांचे आयुष्य, त्यांनी केलेले त्याग आणि देशासाठी दिलेले योगदान मोठ्या पडद्यावर दाखवण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट त्यांच्या आठवणींवर आणि जीवनप्रवासावर आधारित असणार आहे.
टी. जयप्रकाश रेड्डी यांना जग्गा रेड्डी या नावानेही ओळखले जाते. त्यांनी हैदराबाद येथील गांधी भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा प्रस्ताव मांडला. सोनिया गांधी यांचा वाढदिवस 9 डिसेंबर रोजी असतो. याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 2026 पासून चित्रपटाच्याकामाला सुरुवात करण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी म्हणजेच 9 डिसेंबर 2027 पूर्वी हा चित्रपट पूर्ण करण्याचे त्यांचे नियोजन आहे.





