अमरावतीला लवकरच मिळणार स्थानिक पालकमंत्री – बावनकुळे
महापालिकेत 27 नोव्हेंबरला स्वच्छतेसाठी आढावा बैठक

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याची चौफेर प्रगती
अमरावती/13 नोव्हेंबर- स्थानिक जिल्ह्याला लवकरच स्थानिक पालकमंत्री मिळणार असून राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. संभाग मुख्यालय असलेल्या अमरावती शहरातील वाढती अस्वच्छता आणि नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबरला महापालिकेत मोठी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चौफेर प्रगती करत असून 2029 आणि त्यापुढे 2034 पर्यंत राज्याची धुरा त्यांच्याच हाती राहील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बुधवारी सायंकाळी विश्रामगृह परिसरात आयोजित दिवाळी स्नेहमिलनात ते अमरावतीच्या पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधत होते.
अमरावतीसारख्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व पालकमंत्री म्हणून असणे अत्यंत गरजेचे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रांजळपणे मान्य केले. स्थानिक नेता पालकमंत्री असल्यास प्रशासनावर चांगली पकड राहते आणि सर्वसामान्यांची कामे झटपट मार्गी लागतात. महायुतीचे जिल्ह्यात 10 आमदार निवडून आले असले तरी त्यातून योग्य स्थानिक चेहर्याची निवड पक्षश्रेष्ठी नक्की करतील असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या कामाच्या धावपळीचा अनुभव सांगताना बावनकुळे म्हणाले की बुधवारी सकाळी रामटेक येथून 256 किलोमीटर प्रवास करून ते अमरावतीत आले आणि तिथून पुढे 85 किलोमीटर अंतरावरील मेळघाटातील निमकुंड येथे जाऊन पुन्हा अमरावतीत परतले. यानंतर रात्री ते नागपूरकडे रवाना झाले. महसूल खात्याची जबाबदारी सांभाळताना अमरावती आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून यापूर्वीही त्यांनी नागपूर, गोंदिया, भंडारा या 3 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदयशस्वीपणे सांभाळले आहे.शहरातील अस्वच्छता आणि सफाई कंत्राटदारांच्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बावनकुळे यांनी कडक भूमिका घेतली. येत्या 27 नोव्हेंबरला अमरावती महापालिकेत सर्व विभागांची एकत्रित बैठक बोलावली असून या बैठकीत अधिकार्यांकडून प्रत्येक कामाचा सविस्तर हिशोब घेतला जाईल आणि रखडलेल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या संवादावेळी आ. संजय खोडके, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. सुलभा खोडके, आ. प्रताप अडसड, आ. प्रवीण तायडे, आ. चंदू यावलकर, माजी खा. नवनीत राणा यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि प्रवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एका कार्यक्रमात आ. प्रवीण पोटे पाटील यांनी बावनकुळे यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले. राज्यातील जनतेचा फडणवीस यांच्यावर गाढ विश्वास असून त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर वेगाने धावत आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांत राज्यावर 3 वेळा भीषण दुष्काळाचे संकट आले होते परंतु फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आणि पाण्याच्या योग्य नियोजनामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. गरज पडली तेव्हा रेल्वेने पाणी पोहोचवून सरकारने जनतेची तहान भागवली असे ते म्हणाले. कठीण काळात सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांनी दुष्काळी भागातील शेतकर्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. स्वतः बावनकुळे यांनीही बुधवारी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ घेतला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्याशी मनमोकळा संवाद साधला असून संकटाच्या काळात सरकार आपल्यासोबत असल्याचा मोठा विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांच्या पाठबळामुळेच राजकीय प्रवासात झेप
नागपूर, मुंबई, पुणे आणि अमरावतीसह सर्वच शहरांतील पत्रकारांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 1997 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पत्रकारांनीच आपल्याला जनतेचे खरे प्रश्न आणि समस्या दाखवून दिल्या. पत्रकारांनी दिलेले मुद्दे सभागृहात मांडत गेल्यामुळेच आपली राजकीय कारकीर्द घडली आणि आज आपण इथवर पोहोचलो अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली.





