1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह युवक ताब्यात

नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई

नाशिक /13 नोव्हेंबर  : सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, आज नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफने मोठी कारवाई केली असून ऑपरेशन सतर्क अंतर्गत संशयित व्यक्तीकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीकडे असलेल्या बॅगमध्ये मोठी रोकड आढळून आल्यानंतर त्याला विचारणा करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबईसह नाशिक जिल्ह्यातही छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विशेष तपासणीदरम्यान गुरुवारी अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित व्यक्ती आढळला. येथील ट्रेन क्रमांक 22112 अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये कारवाई करण्यात आली असून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बॅग घेऊन जाणार्‍या तरुणाला आरपीएफ जवानांनी रोखले. संशयित तरुणाचे नाव संदीप बाळासाहेब भामरे असून तो मूळ राहणार आटपाडी, जिल्हा सांगली येथील रहिवाशी आहे. मात्र, सध्या तो जळगाव येथील भवानी पेठेत वास्तव्यास आहे. आरपीएफ जवानांनी संबंधित व्यक्तीच्या बॅगेची तपासणी केली असता 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजारांची रोकड आढळली. त्यामुळे, त्यास ताब्यात घेतले असून एवढी मोठी रोकड कुठून आणली, कोणाची आहे आणि वाहतुकीचा उद्देश काय, याबाबत तरुणाकडे विचारणा करण्यात आली. मात्र, तरुणाला समाधानकारक उत्तर, रोकडसंदर्भात माहिती किंवा वैध कागदपत्रे देता आली नाहीत. त्यामुळे, आरपीएफ जवानांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे

Back to top button