विळा किंवा दराती म्हणजे शेतकर्‍याचा दुसरा हातच

ग्रामीण भागात आजही खरपाच्या दगडावर धार लावण्याची परंपरा कायम

चिंचोली गवळी /13 नोव्हेंबर – शेतकरी आणि विळा किंवा दराती यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे. शेतीतील अनेक कामांसाठी विळा हा शेतकर्‍याच्या हातातील महत्त्वाचे साधन असून, विळा किंवा दरातीशिवाय शेतकर्‍याचे कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच विळा म्हणजे शेतकर्‍याचा दुसरा हातच!
ग्रामीण भागात विळा किंवा दरातीला धार लावण्याच्या प्रक्रियेला ’घरातील’ असेही संबोधले जाते. लोहाराकडून दरातीला व्यवस्थित पाजून घेतल्यानंतर खरपाच्या दगडावर घासून त्याला योग्य धार आणली जाते. शहरी भागात खरपाचे दगड क्वचितच दिसत असले, तरी ग्रामीण भागातील चौकाचौकांत आजही हे दगड पाहायला मिळतात.
सकाळी शेतकरी शेतातील कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी खरपाच्या दगडावर बसून आपल्या दरातीला धार लावतो आणि त्यानंतरच शेताकडे रवाना होतो. ही ग्रामीण भागातील रोजच्या जीवनातील एक परंपरा बनली आहे. विशेष म्हणजे दरातीला धार देताना शेतकर्‍यांचे सवंगडीही जवळ येऊन बसतात. धार लावण्याच्या निमित्ताने विविध विषयांवर गप्पांची मैफल रंगते. आज कोणाच्या शेतात चारा चांगला आहे, कोण कुठे कामाला गेला होता, शेजारच्या शेतात काय परिस्थिती आहे, अशा अनेक विषयांवर चर्चा सुरू असते. कधी शेतीच्या कामांचे नियोजन होते, तर कधी गावातील घडामोडींवरही गप्पा रंगतात. खरपाच्या दगडांबाबतही शेतकर्‍यांना चांगलीच माहिती असते. कोणत्या दगडावर दरातीला लवकर आणि चांगली धार येते, याचा अनुभव त्यांना असतो. एखाद्या चौकातील दगडावर धार चांगली येत नाही, तर पाटलांच्या घराजवळ असलेला जुन्या काळातील मोठा खरपाचा दगड अधिक चांगला आहे, अशी माहिती शेतकरी एकमेकांना देतात. म्हणजेच दरातीला धार लावण्यासाठी योग्य दगड निवडण्याचेही एक वेगळे कौशल्य ग्रामीण शेतकर्‍यांकडे आहे. दरातीचेही अनेक प्रकार आहेत. निंदणी, खुरपणी आणि गवत कापण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या दराती वापरल्या जातात. जनावरांसाठी चारा कापणे, शेतीतील तण काढणे, तसेच इतर लहान-मोठी कामे करण्यासाठी दरातीचा उपयोग होतो. अलीकडच्या काळात शेतामध्ये खत टाकण्यासाठीही कमरेपर्यंत लांब असलेली विशेष दराती तयार केली जाते. तिच्या पुढील बाजूला टोकदार भाग असतो. त्याच्या साहाय्याने उभ्यानेच जमिनीत छिद्र करून त्यामध्ये खत टाकता येते आणि त्याच वेळी ते छिद्र झाकताही येते. अशा प्रकारची जंबो दरातीही आता ग्रामीण भागात पाहायला मिळते. काही शेतकरी बांबूच्या टोकाला दराती बांधून उंच झाडांवरील जनावरांसाठी लागणारा चारा कापतात. त्यामुळे झाडावर चढण्याची गरज न पडता उंच फांद्यांवरील चारा सहज कापता येतो. अशा प्रकारे गरजेनुसार दरातीचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.एकंदरीत पाहता, शेतीतील निंदणी, खुरपणी, चारा कापणे, तण काढणे, तसेच इतर अनेक कामांसाठी विळा किंवा दराती हे अत्यावश्यक साधन आहे. शेतकर्‍याच्या दैनंदिन जीवनात या साधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक शेतीची साधने उपलब्ध झाली असली, तरी विळा आणि दरातीचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. खरपाच्या दगडावर दरातीला धार लावतानाच्या गप्पा, सवंगड्यांची मैफल आणि सकाळच्या कामाची लगबग हे ग्रामीण जीवनाचे एक वेगळेच चित्र आजही जिवंत ठेवत आहे.

Back to top button