दारूच्या नशेत एसआरपीएफ जवानाचा धिंगाणा

एसआरपीएफ परिसरात रात्री गोंधळ घालून नागरिकांना त्रास

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

अमरावती/13 नोव्हेंबर– दारूच्या नशेत एसआरपीएफच्या एका जवानाने परिसरात धिंगाणा घालत गोंधळ निर्माण केल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. नशेत असलेल्या जवानाच्या आरडा ओरड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत एसआरपीएफच्या अधिकार्‍यांनी संबंधित जवानाची वैद्यकीय तपासणी केली असून, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसआरपीएफ परिसरातील गट क्रमांक 9 मध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने दारूचे सेवन केले होते. त्यानंतर त्याने परिसरातच मोठ्याने आरडाओरड सुरू केली. नशेत असलेल्याया जवानाने धिंगाणा घालत उपस्थित लोकांशी वाद घालण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी त्याला समजावून सांगण्याचा आणि वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वागण्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या जवानाचे मूळ गाव अकोला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुणे येथेही याच जवानाकडून अशाच प्रकारचा गोंधळ घालण्यात आल्याची चर्चा आहे. तेथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेरही त्याने गोंधळ घातल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या घटनेची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एसआरपीएफच्या कर्मचार्‍यांनी संबंधित जवानाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात पीएसआय धुर्वे यांनी तक्रार दिली आहे. आता या तक्रारीच्या आधारे संबंधित जवानावर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button