शहराची प्रत्येक गल्ली अन् चौक सीसीटीव्ही कॅमेर्यात बंदिस्त होणार
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी 100 कोटींचा विशेष निधी मंजूर

शहरात महिलांच्या सुरक्षेला प्रशासनाचे सर्वाधिक प्राधान्य
अमरावती/13 नोव्हेंबर – अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहरात तिसर्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे. यामुळे अमली पदार्थांची तस्करी, खून आणि गुंडगिरीला कायमचा आळा बसून सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना रात्री उशिरापर्यंत निर्भयपणे वावरता येणार आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून घडणार्या खुनाच्या घटना आणि एमडी अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवसायामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अमरावतीला पूर्णपणे व्यसनमुक्त आणि सुरक्षित करण्याचा ठाम निर्धार सरकारने केला आहे. शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणार्या वडाळा परिसर, संजय नगर आणि इर्विन चौक यांसारख्या सर्वच प्रमुख भागांसह आता शहरातील प्रत्येक घर आणि गल्ली सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणली जाणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. शहरातदादागिरी करणारे, चोरी, दरोडे घालणारे आणि मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेले सराईत गुन्हेगार यापुढे शहरात कोणतीही दहशत माजवू शकणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असून, प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे थेट लक्ष राहणार आहे. रात्री 2 वाजता जरी एखादी बहीण किंवा महिला एकटी रस्त्याने प्रवास करत असेल, तरी तिच्याकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, असे सुरक्षित वातावरण शहरात निर्माण केले जाणार आहे. यासोबतच शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरिता देखील 750 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.





