दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसोबत स्नेहभोजन व दिवाळी मिलन कार्यक्रम

माजी पालकमंत्री आ. प्रविण पोटेंचा पुढाकार

बळीराजाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार

अमरावती /13 नोव्हेंबर – माजी पालकमंत्री आ. प्रविण पोटे यांच्या विशेष पुढाकारातून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसोबत स्नेहभोजन व दिवाळी मिलन कार्यक्रम शुक्रवारच्या सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. कठीण संकटातही खंबीरपणे उभ्या असलेल्या बळीराजाचे मनोबल वाढवण्यासाठी आ. पोटे यांनी स्वतः शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा ठोस निर्धार व्यक्त केला.(यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण प्रसंगी शेतकर्‍यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना मानसिक आधार मिळावा या उदात्त हेतूने माजी पालकमंत्री आ. प्रविण पोटे यांनी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. आ. पोटे यांनीथेट शेतकर्‍यांच्या पंगतीत बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि गावाकडच्या मातीशी असलेली नाळ अधिक घट्ट केली. या वेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या आणि अडीअडचणी अत्यंत आपुलकीने जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन पूर्ण ताकदीने बळीराजाच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.माजी पालकमंत्री आ. प्रविण पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्याला ग्रामीण अध्यक्ष आ. प्रताप अडसड, मनपा गटनेते चेतन गावंडे, शहर महिला अध्यक्षा सुधा तिवारी, मेळघाट अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, सरचिटणीस चेतन पवार, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, अंजनगाव सुरजी नगरपरिषद अध्यक्ष अविनाश गायगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गजानन कोल्हे, नितीन गुडदे, दिनेश सूर्यवंशी, जयंता डेहणकर, डॉ. कविटकर, दिलीप निंभोरकर, कपील आडे, बबनराव आवारे, प्रशांत देशपांडे आणि बादल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

Back to top button