प्रश्नपत्रिका फुटल्या की उत्तरतालिकेत घोळ?

एमपीएससी चौकशी आयोगाने मागवली माहिती

नागपूर /13 नोव्हेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांचा नेमका प्रकार काय होता? प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या की उत्तरतालिकांमध्ये काही गैरप्रकार झाले होते? या प्रकरणांशी संबंधित आणखी कोणते पुरावे समोर येणार? अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून निवेदने मागविण्यात आली आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्याची मुदत 16 नोव्हेंबरवरून वाढवून आता 23 नोव्हेंबर 2026 करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणांबाबत माहिती असणार्‍यांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.
एमपीएससीच्या कोणत्या प्रकरणांची चौकशी होणार?- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याची कथित प्रकरणे यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून आयोगाला निवेदने मागविण्यात आली आहेत. यापूर्वी 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Back to top button