पाणी टंचाई संदर्भात स्थायी समितीची आढावा
सभापती विजय अग्रवाल यांच्याकडून महत्वाच्या सूचना

अकोला /13 नोव्हेंबर – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य पाणी टंचाई संदर्भात आज दि. 13 नोव्हेंबर 2026 रोजी मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे स्थायी समिती सभागृह येथे पाणी टंचाई संदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन बोअर, विहीरींचे गाळ काढणे, नवीन हाईड्रंट तयार करणे व शहरातल्या जास्त पाणी असलेले बोअर व विहीर अधिग्रहण करणे, लिकेज दुरूस्ती, नळांना तोट्या बसविणे आदी कामांच्या प्रगतीबाबत प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीत, पाणी टंचाईच्या काळात कोणत्याही प्रकारची हय-गय किंवा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही याची सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांची नोंद घ्यावी. तसेच शहरात होत असलेले लिकेज (गळती) शोधून किंवा नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारीवर दखल घेऊन तात्काळ गळती दुरूस्त करावी, शहरात अवैध नळ जोडणी व लिकेजेसची पाहणी करण्यासाठी झोन निहाय चार पथके कार्यान्वीत करणे, शहरात ज्या नळांना तोट्या नाही अशी नळ जोडणी व अवैध नळ शोध घेऊन नळ जोडणी खंडीत करण्याची मोहीम राबविणे, पाणी टंचाईच्या काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपसात समन्वय ठेऊन काम करणे, शहरात पाणी पुरवठा करतावेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची विशेष दक्षता घेणे, ज्या कंत्राटदाराकडे मनुष्यबळ कमी असेल त्यांना मनुष्यबळ वाढविणे बाबत सुचना देणे, यापुढे ज्या कंत्रादारांकडे मनुष्यबळ कमी आढळले किंवा कामात व्यत्यय निर्माण होत असेल अशा कंत्रादारांचे कंत्राट रद्द करणे आदींबाबत सुचना यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिल्या.





