बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी, वकिलाकडून उकळले तब्बल 2 कोटी

मुंबई /13 नोव्हेंबर : एका 51 वर्षीय वकिलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एका महिलेने 2 कोटी रुपये उकळल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हिमाचलच्या पारूल राणा, तिचे वडील हरविंदर राणा, आई मीना, बहीण निधी आणि मैत्रीण कोनिका वर्मा यांच्यावर खंडणी आणि बदनामीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार वकील यांनी 3 ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. तक्रारदार वकील हे प्रतिष्ठित व्यक्ती असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एफआयआरनुसार, मे 2024 मध्ये पीडित वकिलाची ओळख पारूल राणा हिच्याशी त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक आणि सोशल मीडिया आयडी शेअर केले. जून 2024 मध्ये जेव्हा तक्रारदार जिनिव्हा येथे एका परिषदेसाठी गेले होते, तेव्हा पारूलने रात्री उशिरा कॉल करून तिच्या नातेवाईकाची प्रकृती खालावल्याचे सांगत 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यावर वकिलाने तिला बँक खात्यातून 2.5 लाख रुपये पाठवले. भारतात परतल्यानंतर राणाने विविध कारणांनी पुन्हा पैसे मागितले, ज्यामध्ये मॉडेलिंग खर्चाचा उल्लेख होता. एफआयआरमध्ये असेही नमूद आहे की, पीडित वकिलांनी स्वतः विवाहित असून आपल्याला एक मुलगी आहे, अशी माहिती दिल्यानंतरही पारूलने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले.





