जालन्यात गुप्तधनासाठी अघोरी पूजा: मांत्रिकासह 9 जणांना अटक
मंठा तालुक्यातील पोखरी गावातील प्रकार

जालना/13 नोव्हेंबर -काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणानंतर सरकारने कडक पावले उचलत आरोपीला अटक केली होती, तसेच राज्यभर अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या भोंदूबाबांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असाच एक धक्कादायक अघोरी पूजेचा आणि भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे.जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील पोखरी गावात गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा करण्यात आली. शेतात सोन्याचे सात हंडे पुरलेले असल्याची बतावणी करून बुधवारी रात्री नऊ जणांनी एका शेतात पूजेचा घाट घातला होता. रात्रीच्या अंधारात गुप्तधन मिळवण्यासाठी हा अघोरी विधी सुरू असतानाच, गावकर्यांना याची कुणकुण लागली. गावकर्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही तातडीने दखल घेत एका मांत्रिकासह नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून लिंबू, नारळ, बदाम, सुपारी यांसारखे अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक कार आणि इतर काही संशयास्पद वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.





