सुकळी-नंदापूरच्या 54 शेतकर्‍यांना अनुदानाचे वाटप

2 कोटी 82 लाखांचे सानुग्रह अनुदान, आ.सावरकर यांचा पुढाकार

अकोला /12 नोव्हेंबर- अकोला जिल्ह्यातील सुखळी-नंदापूर येथील संग्राहक तलावासाठी जमिनी दिलेल्या 54 शेतकर्‍यांना अखेर न्याय मिळाला असून, 2006 ते 2013 या काळातील प्रलंबित असलेल्या सानुग्रह अनुदानापोटी 2 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मंजुरीमुळे दिवाळीच्या सणात या बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
सुखळी-नंदापूर येथील तलावासाठी शासनाने शेतकर्‍यांची शेती थेट खरेदीने आणि वाटाघाटीने घेतली होती. त्यासाठी हेक्टरी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही हा पैसा शेतकर्‍यांच्या पदरात पडला नव्हता. जात-पात किंवा धर्म न पाहता केवळ माणुसकी आणि शेतकरी हितासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी पाटबंधारे विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि अर्थ विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. 17 जून 2024 रोजी त्यांनी लेखी पत्र देऊन मूर्तिजापूरप्रमाणेच या गावालाही प्राधान्य देण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला हिरवा कंदील दाखवल्याने हा निधी अकोला पाटबंधारे विभागाकडे वळता झाला आहे. या यशामुळे सर्व शेतकर्‍यांनी आमदार सावरकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करत आभार मानले. या निधीचा लाभ परमेश्वर जनार्दन साखरे, पुष्पाबाई जनार्दन साखरे, गोपीचंद पुरुषोत्तम शिरोळे, गोपाळ बडे इंगळे, विठ्ठल रामकृष्ण मुंडे, सावित्री लक्ष्मण वसू, शिवाजी दत्ताजी देसाई, देवलाल शालिग्राम सागसे, बाबुलाल शालिग्राम सागसे, दिलीप शालिग्राम घाटोळे, ज्ञानेश्वर बळीराम छबिले, शरद बळीराम छबिले, गोपाळ गणेश काळे, नितीन शिवदास शिराळे, सरस्वतीबाई सदाशिव वडनारायण, सुधाकर महादेव वाकडे, बाबन दयाळु सागसे, देवलाल बाबन सागसे, हरीश ज्ञानराम काळे, रमेश पुंडलिकराव पवार, सुभाष महादेव वाकडे, रामदास महादेव वाकडे, विठ्ठल भिमराव सागसे, अनिता हरिदास उपराट, नागोराव आकाशराम उपराट, ज्योती प्रमोद इंगळे, अशोकदास बोरडाराम लोणम, गजानन शालिग्राम सागसे, गंगुबाई गोविंदराव साळुंखे, लक्ष्मी सुदाम टाकसाळ, सुरेश रामभाऊ सागसे, सचिन सागसे, गजानन छबिले, कृष्ण वाकडे, सुभाष कटोले, राजरत्न चक्रनारायण, शिवलाल चक्रनारायण, रामदास सोळंके, राहुल सागसे, बंडूभाऊ इंगळे, गौरव सागसे, दत्तात्रय सुभाष सागसे, माणिकराव तायडे, देवलाल शालिग्राम सागसे, लक्ष्मी बाई, पुरुषोत्तम मालानी, गजानन रामकृष्ण छबिले, उत्तम गोविंदा वाकडनारायण, कुमारी प्रिया कृष्ण वाकडे, आकाश कृष्ण वाकडे, शालिग्राम सागसे, उमेश गोविंदा वाकडनारायण, किशोर गोविंदा वाकडनारायण, प्रमोद इंगळे आणि सुरेश रामभाऊ सागसे या 54 शेतकर्‍यांना मिळाला आहे.

Back to top button