अप्पर वर्धा धरणातील पाणी अमरावतीकरांच्याच हक्काचे

नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीचे पाणी थांबवा

शिवसेना उपनेते सुधीर सूर्यवंशी यांचा इशारा

अमरावती /13 नोव्हेंबर– अप्पर वर्धा धरणात सध्या केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असून शेतीचे रब्बी सिंचन पूर्णपणे थांबविण्यात आले आहे, मात्र दुसरीकडे नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच असल्याने नागरिक आणि शेतकर्‍यांवर मोठा अन्याय होत असून हा पुरवठा तात्काळ बंद न केल्यास अमरावती ते अप्पर वर्धा धरणापर्यंत भव्य पायी संवाद मोर्चा काढण्याचा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुधीर ना. सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यंदा राज्यासह अमरावती जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने पाणीटंचाईचे गडद सावट पसरले आहे. अमरावती शहराला पिण्याचे पाणी पुरविणार्‍या आणि परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीला आधार देणार्‍या अप्पर वर्धा धरणात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावली आहे. अशा बिकट परिस्थितीत धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना रब्बी हंगामासाठी मिळणारे सिंचनाचे पाणी प्रशासनाने बंद केले आहे. परंतु, शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकर्‍यांच्या पोटापाण्याचा विचार न करता नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांना धरणातूनपाणी दिले जात असल्याचा संताप सुधीर ना. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. शेजारील नागपूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तोतलाडोह धरणातील साठा कमी झाल्यामुळे तेथील पिण्याच्या पाण्याचे संकट टाळण्यासाठी शासनाने खापरखेडा आणि कोराडी येथील वीज प्रकल्पांचे पाणी तातडीने बंद केले आहे. मग हाच न्याय अमरावती जिल्ह्याला का लावला जात नाही, असा रोकडा सवाल सुधीर ना. सूर्यवंशी यांनी प्रशासनाला विचारला आहे. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीकरांच्या घशाला कोरड पडू नये म्हणून नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे पाणी तात्काळ बंद करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात ठामपणे मांडले आहे. धरणातील उपलब्ध पाण्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचे नियोजन प्रशासनाने केले असले तरी उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होणार आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी आणखी वेगाने घटून आगामी उन्हाळ्यात अमरावती शहरावर भीषण पाणीटंचाई ओढवण्याची दाट शक्यता आहे. या संकटाची चाहूल लक्षात घेऊन प्रशासनाने आताच जागे व्हावे आणि कारखान्यांचे पाणी बंद करून अमरावतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले तर शहरातील नागरिक आणि बागायतदार शेतकर्‍यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अप्पर वर्धा धरणातील आजचे पाणी नियोजन-अप्पर वर्धा धरणातील एकूण उपलब्ध साठ्यापैकी आगामी काळासाठी 213.87 दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पिण्यासाठी 53.47 दशलक्ष घनमीटर, औद्योगिक वापरासाठी 23.80 दशलक्ष घनमीटर, बाष्पीभवनासाठी 88.51 दशलक्ष घनमीटर, 10 टक्के राखीव साठा 33.09 दशलक्ष घनमीटर, गुरेढोरांसाठी 10.00 दशलक्ष घनमीटर आणि वैध जलाशय उपसा 5.00 दशलक्ष घनमीटर पाण्याचा समावेश आहे.

Back to top button