जुन्या सातुर्ण्यात तरुणावर चाकूहल्ला
पानटपरी बंद करण्याच्या वादातून चौघांची मारहाण, विक्रम ऊर्फ विक्की ठाकूर घटनेत गंभीर जखमी

अमरावती/13 नोव्हेंबर- शहरातील जुन्या सातुर्णा परिसरात पानटपरी बंद करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात 34 वर्षीय विक्रम ऊर्फ विक्की किशोरसिंग ठाकूर हा तरुण गंभीर जखमी झाला. आरोपींनी त्याच्या उजव्या खांद्यावर आणि पाठीवर चाकूने सलग 3 वार केले. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे, जखमी विक्की याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमीला किशोरसिंग ठाकूर यांचा मुलगा विक्रम ऊर्फ विक्की ठाकूर हा जुन्या सातुर्णा परिसरात कन्हैया हॉटेलजवळ पानटपरी चालवतो. 13 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 12 वाजता तो नेहमीप्रमाणे टपरी बंद करत होता. याचवेळी चार आरोपी तेथे आले. टपरी बंद करण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी विक्कीला पकडून ठेवले. त्यातील हर्षल गवळी याने मागून त्याला धरल्याचाआरोप आहे. याचदरम्यान एका आरोपीने चाकू काढून विक्कीच्या उजव्या खांद्यावर आणि पाठीवर सलग 3 वार केले. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी विक्की रात्री सुमारे 12.30 वाजता घरी पोहोचला आणि त्याने आई प्रमीला ठाकूर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या चारचाकी वाहनाजवळ गेला. त्याच्या मागोमाग आई प्रमीला ठाकूर याही तेथे पोहोचल्या. जखमी विक्कीला तातडीने अमरावती येथील इर्विन जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई होऊनही विक्कीवर जीवघेणा हल्ला झाल्याने जुन्या सातुर्णा परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपींना पकडण्याचे आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





