अमरावती महापालिकेच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला अटक घरटॅक्स नावावर करण्यासाठी

घरटॅक्स नावावर करण्यासाठी लाचेची मागणी

दस्तुरनगर झोनच्या कर्मचार्‍यावर सायन्सकोर मैदानात कारवाई

अमरावती /8 ऑक्टोबर– अमरावती महानगरपालिकेच्या दस्तुरनगर येथील झोन 3 कार्यालयातील कनिष्ठ लिपिक भागीरथ अंबादासराव खैरकर याला वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेल्या घराची घरपट्टी मुलाच्या नावावर करून देण्यासाठी 1 हजार 500 रुपयांची लाच घेताना सायन्सकोर मैदानाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले.
महापालिकेच्या दस्तुरनगर येथील झोन क्रमांक 3 कार्यालयात कार्यरत असलेला कनिष्ठ लिपिक भागीरथ अंबादासराव खैरकर (वय 48 वर्षे, रा. शिव छाया कॉलनी, शंकर नगर, अमरावती) याला गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार (वय 50 वर्षे) यांच्या वडिलांनी स्वतःचे घर तक्रारदाराच्या नावे बक्षीसपत्राद्वारे करून दिले होते. या घराची पावती स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यांनी 6 ऑगस्ट रोजी महापालिकेत अर्ज दिला होता. कामाच्या पाठपुराव्यासाठी ते 18 सप्टेंबर रोजी कनिष्ठ लिपिक खैरकर याला भेटले असता, त्याने पावती नावे करण्याच्या मोबदल्यात 1 हजार 500 रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्यानेत्यांनी 7 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे थेट धाव घेऊन तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.10 ते 12.21 दरम्यान या तक्रारीची खातरजमा केली. या पडताळणी दरम्यान खैरकर याने 1 हजार 500 रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास होकार दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिकार्‍यांनी लगेच सापळा रचला. दुपारी 1.37 ते 2.07 च्या सुमारास जिल्हा परिषद शाळा, सायन्सकोर मैदान परिसरात तक्रारदाराकडून 1 हजार 500 रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने खैरकर याला पकडले. त्याच्या विजारीच्या खिशात ठेवलेली लाचेची रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. या प्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या पर्यवेक्षणात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस अंमलदार मोहन ठाणेकर, उपेंद्र थोरात, पोलीस उपनिरीक्षक सतीश किटुकले, चालक अंमलदार गोवर्धन नाईक यांनी केली

Back to top button