श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे बुधवारी भव्य दहीहंडी सोहळा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुर्‍हा /22 नोव्हेंबर  :  विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक मास सोहळा 2026 अंतर्गत कार्तिक प्रतिपदा (दहीहंडी) निमित्त बुधवार, दि. 25 नोव्हेंबर 2026 रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक, आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कौंडण्यपूर नगरी विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत श्रींच्या महापूजेने होणार असून, ही महापूजा सौ. व श्री. राजेश वानखडे (आमदार, तिवसा विधानसभा मतदारसंघ) तसेच सौ. व श्री. नामदेव अमाळकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान) यांच्या शुभहस्ते संस्थानच्या समस्त विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत संपन्न होईल.
त्यानंतर सकाळी 7.30 वाजता ह.भ.प. पंकज महाराज महल्ले, कौंडण्यपूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पालख्या व दिंड्यांची भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. या नगरप्रदक्षिणेत परिसरातील वारकरी, भाविक व भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.सकाळी 10 ते 11 या वेळेत श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्या वतीने खंजेरी भजनाचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात येईल. दुपारी 12 ते 2 या वेळेत बीड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यांना कौंडण्यपूर व पंचक्रोशीतील वारकरी तथा भजनी मंडळांची साथसंगत लाभणार आहे.दुपारी 2 ते 3.45 या वेळेत आमंत्रित महंतांचे आशीर्वादपर मार्गदर्शन होणार असून, दुपारी 3.45 वाजता काल्याचा अभंग होईल. त्यानंतर दहीहंडी सोहळ्यासाठी सर्व दिंड्या व पालख्यांसह गोपाळपुरी टेकडीकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.
सायंकाळी 4 वाजता गोपाळपुरी (दहीहंडी टेकडी) येथे मुख्य दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला संत जिनेंद्रनाथ महाराज, जगद्गुरू श्री राजराजेश्वराचार्य महाराज (माऊली सरकार), श्री संत सचिनदेव महाराज व संत सयाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संत-महंतांच्या पावन सान्निध्यात तसेच सर्व पदाधिकारी व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.
कार्तिक मासातील या पवित्र पर्वानिमित्त होणार्‍या महापूजा, नगरप्रदक्षिणा, भजन, कीर्तन आणि दहीहंडी सोहळ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तीभाव व धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे परिसरातील तसेच दूरवरून येणार्‍या सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा व संत-महंतांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद साधू, सचिव, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे करणार आहेत.

Back to top button