गाडगेनगर ठाणे हद्दीतील डॉ. जयस्वाल अटकेत

डॉ. भोजने बहुचर्चित बाळ विक्री प्रकरणी धक्कादायक खुलासा

पंधरा वर्षांची रुग्णालयातील नोंदवही चक्क गायब
तपासाची चक्रे आता शहरातील मोठ्या दवाखान्यांकडे
बारा वर्षांपूर्वीच्या बाळाचा कसून शोध सुरू

अमरावती /22 नोव्हेंबर  – संपूर्ण शहराला हादरवून सोडणार्‍या बहुचर्चित बाळ विक्री प्रकरणात पोलिसांच्या तपासाची चक्रे आता शहरातील मोठ्या दवाखान्यांकडे वळली आहेत. या प्रकरणात गाडगे नगर ठाणे हद्दीतील डॉ. जयस्वाल याला अटक करण्यात आली असून एका नवजात बाळाची सुटका करत आरोपींची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दवाखान्याची मागील 15 वर्षांची नोंदवही गायब असून बारा वर्षांपूर्वी सोनाराला विकलेल्या बाळाचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे.
शहरात खळबळ उडवून देणार्‍या या बाळ विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत गाडगे नगर भागातील एका नामवंत डॉ. जयस्वाल याला बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच शुक्रवारी आणखी एका नवजात बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. यामुळे तस्कर आणि खरेदीदारांच्या तावडीतून सोडवण्यात आलेल्या बाळांची एकूण संख्या 4 झाली आहे. या बाळाला विकत घेणार्‍या 2 आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून आतापर्यंत अटक केलेल्या एकूण आरोपींचा आकडा 14 वर गेला आहे.
तपासादरम्यान पोलिस पथक जेव्हा संबंधित दवाखान्यात पोहोचले, तेव्हा तिथला प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले. पोलिसांनी दवाखान्यातून मागील केवळ 2 वर्षांची नोंद असलेली वही जप्त केली आहे. त्याआधीच्या तब्बल 15 वर्षांची नोंदवही दवाखान्यातून गायब असल्याचे समोर आले आहे. या प्रदीर्घ काळातील कागदपत्रांमध्ये बाळ तस्करीचे आणखी मोठे गुपित दडलेले असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे या टोळीशी संबंधित अनेक संशयित आणि दलाल सध्या फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीत आतापर्यंत भोजने पती-पत्नी, गाडगे नगरचा डॉ. जयस्वाल, डॉ. मयूर दांडगे, निर्मल सरदार, सिस्टर मेरी उर्फ प्रतिभा नगराळे, डफरीन रुग्णालयाची कर्मचारी संगीता गवळी यांच्यासह बाळ विकत घेणारे पती-पत्नी अशा 14 जणांना अटक झाली आहे. यातील एक खरेदीदार दाम्पत्य, संगीता गवळी आणि सिस्टर मेरी हे सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
दुसरीकडे, 17 तारखेला अटक झालेल्या डॉ. वैशाली भोजने हिच्या चौकशीतून बारा वर्षांपूर्वीचे एक जुने प्रकरणही उजेडात आले आहे. 2014 मध्ये बेलपुरा भागातील एका महिलेला मुलगी झाली होती. पतीच्या मणक्याचे मोठे दुखणे आणि घरच्या गरिबीमुळे तिला काम करणे गरजेचे असल्याने हे बाळ नको होते. त्यावेळी डॉ. वैशाली भोजने हिने एका सोनाराला बाळ हवे असल्याचे सांगून त्या आईला 50 हजार रुपये दिले आणि कागदपत्रांवर सह्या घेत बाळ सोनाराच्या ताब्यात दिले. या माहितीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी दुपारी एका महिला डॉक्टरची सायंकाळपर्यंत कसून चौकशी करत लेखी जबाब नोंदवला आहे. ते बाळ आता 12 वर्षांचे झाले असून पोलिस गोपनीयता राखत त्या मुलाच्या खर्‍या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.
अनाथ बाळांच्या भविष्यासाठी कडक अट -सुटका केलेल्या चारही नवजात बाळांना बाल न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक होलीक्रॉस शिशुगृहात दाखल केले असून तिथे त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. या बाळांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे योग्य दाम्पत्याला दत्तक घेता येईल. मात्र, बाळांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी दत्तक घेणार्‍या कुटुंबाला आपल्या एकूण मालमत्तेचा 60 टक्के हिस्सा संबंधित बाळाच्या नावे करणे बंधनकारक राहणार आहे.

Back to top button