पुस्तक फाडण्याची कृती मला मान्य नाही
आशिष शेलारांनी मांडली स्पष्ट भूमिका

शिवसेनेच्या कृतीवरून राजकीय चर्चेला उधाण
पुणे /22 नोव्हेंबर : भाजप नेते आशिष शेलार यांनी पुस्तक फाडणे हे आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी संबंधित वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा तथा ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे पाने फाडली होती. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी या पुस्तकाची पाने फाडली होती.
सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ’बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या पुस्तकातील काही मजकूरवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला. शिवसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकूरवर आक्षेप घेत निषेध नोंदवला होता. तसेच त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेचे प्रवक्ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पानेदेखील फाडली होती.
याचवेळी पुस्तकातील काही फोटो फाडत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे आणि मणिशंकर अय्यर यांचा एकत्रित असलेला फोटो फाडला होता. या फोटोवरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला. शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला, असा आरोप केला जात होता.विरोधकांनी या मुद्द्यावरुन प्रचंड रान पेटवलं. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांनी मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा दावा केला होता. तसेच शायना एनसी यांनीदेखील तसाच दावा केला. पण वाद वाढल्यानंतर शायना एनसी यांनी जाहीरपणे माफी मागितली होती. या सगळ्या गदारोळानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या मुद्द्यावर जाहीर कार्यक्रमात भाष्य केलं आहे. पुस्तक फाडणं हे आपल्याला मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत.





