विकसित भारताच्या संकल्पनेत बालकांचे आरोग्य आणि पोषण महत्त्वाचे; स्मृती इराणी
आंध्र प्रदेशातील पिठापूरम येथे ‘अपोलो आरंभ’ मॉडेल अंगणवाडीचे उद्घाटन

केवळ लाभार्थ्यांची संख्या नव्हे, तर प्रत्येक बालकाच्या विकासासाठीची बांधिलकी महत्त्वाची
अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या योगदानाचे केले कौतुक
पिठापूरम /21 नोव्हेंबर : विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील लहान बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री स्मृती झेड. इराणी यांनी केले. आंध्र प्रदेशातील पिठापूरम येथे त्यांच्या हस्ते ‘अपोलो आरंभ’ या मॉडेल अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. अपोलो फाउंडेशन आणि आंध्र प्रदेश सरकारच्या महिला विकास व बालकल्याण विभागाच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
इराणी यांनी सांगितले की, भारतात सहा वर्षांखालील सुमारे १३ कोटी बालके आहेत. हीच पिढी भविष्यात विकसित, सक्षम आणि समृद्ध भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे बालकांचे आरोग्य, पोषण, प्राथमिक शिक्षण आणि सर्वांगीण जडणघडण ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता सामूहिक प्राधान्याची बाब ठरली पाहिजे.
‘अपोलो आरंभ’ हा उपक्रम विशेष असल्याचे सांगताना त्यांनी त्यामागील नियोजन आणि बांधिलकीचा उल्लेख केला. केवळ २० बालकांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी या प्रकल्पाच्या तयारीला सुमारे दीड वर्ष लागले. विकासाचे मोजमाप केवळ किती लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचली यावर न करता, प्रत्येक लाभार्थ्याच्या विकासासाठी किती गांभीर्याने प्रयत्न झाले, यावरही झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
‘तिथी भोजन’ उपक्रमात ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन
गावातील नागरिकांनी ‘तिथी भोजन’ ही संकल्पना स्वीकारावी, असे आवाहनही इराणी यांनी केले. वाढदिवस, विवाह समारंभ आणि सण-उत्सव अशा आनंदाच्या प्रसंगी बालके आणि मातांसाठी फळे व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे समाजातील प्रत्येक घटक बालकांच्या पोषणासाठी योगदान देऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पर्यवेक्षक आणि तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. बालकांच्या आरोग्य आणि विकासासाठी प्रत्यक्ष काम करणारे हेच या अभियानाचे खरे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेला ‘सबका प्रयास’ची जोड मिळाल्यासच तिचा व्यापक उद्देश साध्य होईल, असा संदेशही त्यांनी दिला.





