अमोल पखालेच्या नेमबाजीने भारताला कांस्य

चिनी तैपेईला शूट ऑफमध्ये हरवून पुरुष संघाची बाजी

महिला संघालाही कांस्यपदक; आज पुन्हा 5 पदकांची संधी

अमरावती/20 नोव्हेंबर  – हाँगकाँग – आशियाई चषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत शुक्रवारी 2 कांस्यपदके पटकावली. अमरावतीचा अमोल पखाले याने पुरुष रिकर्व्ह संघातून खेळताना चिनी तैपेईविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघाने चुरशीच्या लढतीत शूट ऑफमध्ये 5-4 असा विजय मिळवला. तर महिला कंपाऊंड संघाने इंडोनेशियाला 230-228 असे हरवून कांस्यपदक जिंकले. शनिवारी भारताला आणखी 5 पदके जिंकण्याची संधी आहे.
महिला कंपाऊंड संघात अदिती स्वामी, पृथिका प्रदीप आणि तेजल साल्वे यांचा समावेश होता. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. चार फेर्‍यांमध्ये 58-54, 59-58, 57-59 आणि 56-57 अशी गुणांची नोंद झाली. अखेर भारतीय संघाने बाजी मारली. पुरुष रिकर्व्ह संघात उज्ज्वल धामा, गोल्डी मिश्रा आणि अमोल पखाले यांनी चिनी तैपेईला कडवी टक्कर दिली. पहिल्या फेरीत भारताने 53-50 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत 51-53 अशी पिछाडी झाल्याने सामना 2-2 असा बरोबरीत आला. तिसर्‍या फेरीतही भारत 53-55 असा मागे पडला. मात्र चौथ्या फेरीत 59-52 अशी सरशी साधत भारताने सामना 4-4 असा बरोबरीत आणला. निर्णायक शूट ऑफमध्ये भारताने 30 गुण मिळवले, तर चिनी तैपेईला 28 गुणच मिळवता आले. शनिवारी पुरुष आणि महिला कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात पदकांचे सामने होणार आहेत. पुरुष कंपाऊंड संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुवर्णपदकासाठी लढत होईल. अदिती स्वामीचा सामना चीनच्या झांग वेनशी, तर पृथिका प्रदीपचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह युनशी होणार आहे. पुरुष गटात गणेश तिरुमुरू याची लढत ऑस्ट्रेलियाच्या वाइल्डमॅन बेलीशी, तर सचिन चेची याची लढत चीनच्या ची बिंगशी होईल.

Back to top button