अचलपूर महिला व बाल रुग्णालयाचा कारभार रामभरोसे
21 गंभीर त्रुटी उघड, तरी रुग्णांच्या हालअपेष्टा कायम

अचलपूर /20 नोव्हेंबर : अचलपूर महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवांचा कारभार दिवसेंदिवस प्रश्नांच्या भोवर्यात सापडत असून, रुग्णालयातील असुविधा, वैद्यकीय उपकरणांचा अभाव, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने रात्री 9.20 वाजता केलेल्या अचानक तपासणीत तब्बल 21 गंभीर त्रुटी उघड झाल्या होत्या. सात दिवसांत त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊनही रुग्णालयातील समस्यांचा पाढा कायम असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तीन महिन्यांपासून फिजिशियन नसल्याचा आरोप, सोनोग्राफी मशीन बंद, प्रसूती कक्षातील अस्वच्छता, औषधे व वैद्यकीय उपकरणांचा अभाव आणि रुग्णांना विभागनिहाय भटकंती करावी लागत असल्याने रुग्णालयाचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अमरावती यांनी 3 नोव्हेंबर रोजी संबंधित प्रशासनाला पत्र पाठवून सात दिवसांच्या आत सुधारात्मक कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, मुदत संपूनही प्रत्यक्षात किती सुधारणा झाल्या आणि रुग्णांना त्याचा किती लाभ मिळाला, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





