कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिवारासह विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
वारकरी दांपत्य सुधाकर आणि प्रणिता शिंदे यांना पूजेचा मान

शेतकऱ्यांची संकटे दूर होऊन सुख-समृद्धी नांदावी, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
पंढरपूर /21 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवारासह पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उचेगाव येथील वारकरी दांपत्य सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे यांना महापूजेचा मान मिळाला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संकटे दूर व्हावीत, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली. महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम आरोग्य आणि आनंद लाभावा, अशीही प्रार्थना करण्यात आली.





