पुण्यातील महिला डॉक्टरला 3 लाखांचा गंडा
विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय..

अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
मुंबई / 20 नोव्हेंबर -सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. आता थेट राज्यातील धडाकेबाज आयपीएस अधिकारी आणि सध्या नागपूर शहर पोलीस आयुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरला 3 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला असून, याप्रकरणी 43 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी महिला डॉक्टरच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने ’मी सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी बोलतोय आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा असिस्टंट आहे’ असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच दुसर्या एका क्रमांकावरून फोन आला आणि समोरील व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक असून तुम्ही अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवून पैसे कमवत आहात, तसेच तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात आले आहे, अशी भीती चोरट्यांनी दाखवली. अटक टाळायची असेल तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरावे लागतील, असे धमकावल्याने घाबरलेल्या महिला डॉक्टरने चोरट्यांच्या खात्यावर 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नावाचा वापर करून ’डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करत दोन भामट्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केल्याची भीती दाखवून तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्या प्रकरणात सायबर सेलच्या पथकाने कानपूर आणि इंदूरमध्ये छापेमारी करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.





