नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरचा मार्ग मोकळा; भूसंपादन १०० टक्के पूर्ण, लवकरच काम सुरू होणार!
निविदा आणि कंत्राट मंजुरीची प्रक्रियाही पूर्ण

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
२०२३ पासून विविध स्तरांवर सातत्याने केला पाठपुरावा
पुणे/19 नोव्हेंबर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन १०० टक्के पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया आणि कंत्राट मंजुरीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
या प्रकल्पातील भूसंपादनाला गती मिळावी यासाठी कोल्हे यांनी मार्च २०२३ पासून सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पीएमआरडीएच्या आयुक्तांपर्यंत विविध स्तरांवर त्यांनी पत्रव्यवहार केला. भूसंपादनासाठी समन्वय बैठक घेणे, अतिरिक्त जमीन संपादनाला प्राधान्य देणे आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या.
२०२५ मध्ये तसेच २०२६ मध्येही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला. ऑगस्ट २०२६ मध्ये पीएमआरडीए आयुक्तांची भेट घेण्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली होती.
या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सांगत कोल्हे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या विश्वासामुळे हे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. आता प्रत्यक्ष काम लवकर सुरू व्हावे, तसेच ते दर्जेदार आणि निर्धारित गतीने पूर्ण व्हावे, यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कॉरिडॉरमुळे परिसरातील दळणवळणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





