रोजगारनिर्मितीची जबाबदारी केंद्र सरकारची; उद्योगपतींना सवाल करण्याआधी दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचे उत्तर द्या – विजय वडेट्टीवार
पंतप्रधान मोदींच्या फिक्कीतील वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांची टीका

कर्जमाफी आणि करसवलतींचा रोजगारनिर्मितीसाठी किती उपयोग झाला, असा सवाल
बेरोजगार तरुणांची माफी मागून ठोस कृती करण्याची मागणी
मुंबई /19 नोव्हेंबर : देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. फिक्कीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपतींना ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ असा सवाल केला. मात्र, देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उद्योगपतींची नसून केंद्र सरकारची आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची प्रत्यक्षात किती पूर्तता झाली, याचे उत्तर पंतप्रधानांनी आधी द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. रोजगारनिर्मितीबाबत उद्योगपतींना प्रश्न विचारण्याऐवजी सरकारने स्वतःच्या कामगिरीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
उद्योग क्षेत्राला केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर करसवलती देण्यात आल्या. तसेच उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याचे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, या सर्व उपाययोजनांचा देशातील रोजगारनिर्मितीवर नेमका किती परिणाम झाला आणि तरुणांना किती नवीन रोजगार मिळाले, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी बेरोजगारीचा मुद्दा सातत्याने मांडत असताना भाजपकडून त्यांची खिल्ली उडवली जात होती, असेही वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आता पंतप्रधानांच्या वक्तव्यातूनच रोजगारनिर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारने रोजगारनिर्मितीतील अपयशाची जबाबदारी उद्योगपतींवर ढकलू नये. बेरोजगार तरुणांची माफी मागून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.





