शायना एन.सी. यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध

राजकमल चौकात शिवसेना उबाठाचे आंदोलन

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या अवमानाचा आरोप

अमरावती /19 नोव्हेंबर- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा कथित अवमान झाल्याच्या निषेधार्थ अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. गुरुवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या नेत्या शायना एन.सी. यांच्या छायाचित्राला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर शिवसैनिकांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधित महिला नेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटाच्या संबंधित महिला नेत्याकडून एक दिवसापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अपमान करण्यात आल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांतून समोर आली होती. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे संस्थापक नव्हते, तर हिंदू समाजासह मराठी जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. त्यामुळे त्यांच्या छायाचित्राचा कथित अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. राजकमल चौकातील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी छायाचित्राला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवसेनेचा विजय असो आणि शायना मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांकडे लेखी तक्रार देत संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास शहरात यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला. आंदोलनात उपनेते सुधीर सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक नितीन तारेकर, महिला संपर्कप्रमुख प्रतिभा बोबडेपाटील, जयश्री कुहेर, रामा सोलंके, बाळू तलोकार, संजय सालवीकर, बाळा सावरकर, रवी काकडे, संजय गोंडाणे, शेखर घिमे, शुभम पाटील, चंद्रशेखर गिरी, विनोद मंडलकर, रामदास वजरे, उमेश जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.

Back to top button