महापालिका आमसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने
नगररचना विभागाच्या कारभारावर नगरसेवकांचा जोरदार हल्लाबोल

अधिकार्यांच्या मनमानीवर सत्ताधार्यांनीही पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
सभागृहात गोंधळ घालणार्या बसपा नगरसेवकांना नेत्यांनी फटकारले
आमसभेत अधिकार्यांच्या कामाचा सभापतींनी घेतला खरपूस समाचार
अमरावती/19 नोव्हेंबर – महापालिकेच्या आमसभेत गुरुवारी अधिकार्यांच्या मनमानी कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही गट आक्रमक झाले. नगररचना विभागाच्या ढिसाळ कारभारावर नगरसेवकांनी सडकून टीका करत सभागृह दणाणून सोडले. चार वर्षे प्रशासक राज राहिल्याने अधिकारी कुंभकर्णी झोपेत गेल्याचा आरोप सभागृहात झाला. अखेर सभागृह नेते चेतन गावंडे यांनीही महापालिकेचा कारभार देवाच्या भरवशावर सुरू असल्याची कबुली दिली. वाढत्या दबावानंतर नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करत आठवड्यातून 3 दिवस नियमित कार्यालयात बसण्याची ग्वाही दिली.
महापालिकेच्या आमसभेची सुरुवात गुरुवारी वंदे मातरम गीताने झाली. त्यानंतर भाजपचे स्वीकृत सदस्य संजय तिरथकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र औपचारिक कामकाज सुरू होताच बसपा नगरसेवकांनी कोणार्क हटाव शहर बचाओ अशी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने सुरू केली. या प्रकारावर विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृहाच्या काही परंपरा असतात आणि असा गोंधळ परंपरांना शोभणारा नाही असे सांगत दोन्ही नेत्यांनी आंदोलक नगरसेवकांना शांत बसण्याची तंबी दिली. त्यानंतर प्रशासनाने 1 जानेवारी 2011 पूर्वीची सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी संगणकीय प्रणाली सुरू करण्याचा विषय मांडला. याच दिवशी या प्रणालीचे लोकार्पणही ठरले होते. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक बबलू शेखावत आणि एमआयएमचे गटनेते शेख हमीद यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रशासनाने हा निर्णय शासनाच्या आदेशानुसार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगरसचिव अक्षय निलंगे यांच्या कामावरूनही चर्चा रंगली असता ते नवीन असून हळूहळू कामकाजाची पद्धत शिकतील अशी बाजू चेतन गावंडे यांनी मांडली.
सभागृहात अधिकार्यांच्या वागणुकीचा मुद्दा चांगलाच तापला. अनेक अधिकारी आणि कर्मचारी नगरसेवकांचे दूरध्वनी देखील उचलत नसल्याची तक्रार विलास इंगोले यांनी केली. लोकप्रतिनिधींना काही मानसन्मान आहे की नाही असा सवाल करत प्रशासक राजवटीत बिघडलेली घडी तातडीने बसवावी आणि कामचुकार अधिकार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली.
यावर अनेक अधिकार्यांकडे एकापेक्षा जास्त विभागांचा भार असल्याने कामाच्या ताणामुळे दूरध्वनी उचलणे शक्य होत नसावे असे सांगत गावंडे यांनी अधिकार्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनीही उद्यान, पथदिवे, स्वच्छता आणि बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. शहरातील कचरा प्रश्न आणि मोकाट कुत्र्यांच्या त्रासावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. नगरसेवकांच्या तक्रारींचा पाऊस पाहून सभापती श्रीचंद तेजवानी यांनी अधिकार्यांचे चांगलेच कान टोचले. चार वर्षे सर्वजण कुंभकर्णी झोपेत होते आणि आता कुठे त्यांना जाग आली असल्याने गाडी रुळावर यायला थोडा वेळ लागेल असा टोला त्यांनी लगावला. याच वेळी विलास इंगोले यांनी सभागृहातील दोन प्रकारच्या आसन व्यवस्थेवर आक्षेप घेत सर्वांना समान आसन व्यवस्था देण्याची मागणी केली. तसेच काँग्रेसचे स्वीकृत सदस्य अनिल अग्रवाल यांनी 3 आमसभांची एकत्रित विषयपत्रिका दिल्याने आणि त्यात अनुक्रमणिका नसल्याने प्रशासनाला धारेवर धरले.
सभागृहातील सर्वात मोठा भडका नगररचना विभागाच्या कारभारावरून उडाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदू खेडकर यांनी 3 महिने उलटूनही या विभागाचे विषय पडून असल्याचा जाब विचारला. विलास इंगोले यांनीही नगररचना विभागाचे अधिकारी स्वतःला जिल्हाधिकारी समजतात का असा संतप्त सवाल केला. अनिल अग्रवाल यांनी या विभागाच्या अस्थिरतेवर बोट ठेवत येथील खुर्ची संगीत खुर्ची बनली असून कोण कधी येते आणि जाते हेच कळत नसल्याची टीका केली.
या टीकेनंतर स्वीकृत सदस्य मिलिंद चिमोटे यांनीही आक्रमक होत आमसभेच्या अधिकारांना डावलणार्या अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली. या सर्व गदारोळानंतर सहायक संचालकांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आणि सोमवार ते बुधवार असे 3 दिवस नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
सत्ताधार्यांनीही मान्य केली प्रशासकीय कारभाराची दयनीय अवस्था
नगररचना विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच सभागृह नेते चेतन गावंडे यांनीही पहिल्यांदाच प्रशासनाविरोधात आपली नाराजी उघड केली. खालच्या स्तरावरील अधिकारी कोणाचेही ऐकत नसून मनमानी पद्धतीने काम करत आहेत. सध्या महापालिकेचा संपूर्ण कारभार केवळ देवाच्या भरवशावर सुरू असल्याची थेट कबुली गावंडे यांनी भर सभागृहात दिली.
प्रशासक राजवटीनंतर पहिल्यांदाच गाजली आमसभेची बैठक
तब्बल 4 वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर झालेल्या या आमसभेत नगरसेवकांचा साचलेला संताप पाहायला मिळाला. शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, बंद पथदिवे आणि अतिक्रमण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला घेरले. अधिकार्यांची ही उदासीनता अशीच राहिली तर शहराचा विकास ठप्प होईल अशी भीती व्यक्त करत यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सभागृहाने दिला.





