कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
मानाचे वारकरी सुधाकर शिंदे दाम्पत्याला पूजेचा मान

वारकऱ्यांना सुलभ दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन बंद
दर्शन मंडपासाठी २५ कोटींचा अतिरिक्त निधी; पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच
पंढरपूर /20 नोव्हेंबर : कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदावे, असे साकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.
महापूजेच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मानाचे वारकरी सुधाकर शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे उपस्थित होत्या. पूजेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.
यावेळी बोलताना शिंदे यांनी सर्वसामान्य वारकऱ्यांना कमी वेळेत आणि सुलभतेने दर्शन मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे सांगितले. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाला असून वारकऱ्यांना लवकर दर्शन घेता येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, खरीप आणि रब्बी हंगामातील कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असून दिवाळीच्या काळात आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीतील विविध सवलतीही लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी आणि कार्तिकी यात्रेतील वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. दर्शन मंडपासाठी पर्यटन विभागामार्फत अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच केले जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’चे प्रकाशनही करण्यात आले.





