अंजनगाव सुर्जी तालुक्यात अपघातांची मालिका चिंताजनक

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर

अंजनगाव सुर्जी/20 नोव्हेंबर  : अंजनगाव सुर्जी शहरासह तालुक्यात अलीकडच्या काळात घडलेल्या अपघातांच्या घटनांनी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. अवघ्या दहा दिवसांत तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वारंवार घडणार्‍या दुर्घटना लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने समन्वयाने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी तालुक्यात जोर धरत आहे.
गुरुवार (दि. 19 नोव्हेंबर) रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास शहरातील पारीख पेट्रोल पंपाजवळ भरधाव पल्सर दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात पांढरी येथील ऋतीक संतोष मुरतकर (वय 25) या युवकाचा मृत्यू झाला. यापूर्वी 9 नोव्हेंबर रोजी कोकर्डा फाट्यावर झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण तालुका हादरला असुन, रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शहरातील प्रमुख महामार्ग, रस्ते, चौक आणि संपूर्ण वर्दळीच्या परिसरात वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच अल्पवयीन वाहनचालकांवर वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवून मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button