विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जि.प. मुलांच्या शाळेत सीसीटीव्हीची सुविधा
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोषण जयसिंग पुनिया यांच्या पुढाकाराला यश

अंजनगाव बारी/20 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेतील शिस्त आणि शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मुलांची शाळा, अंजनगाव बारी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोषण जयसिंग पुनिया यांच्या पुढाकाराने आणि सर्वांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वी झाला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सर्व समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांच्या सहकार्याने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शाळेतील विविध भागांवर देखरेख ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे तसेच शाळेतील शिस्त व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
आजच्या काळात शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय हा काळाची गरज ओळखून उचललेले सकारात्मक पाऊल ठरत आहे. या उपक्रमामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. सर्वांच्या एकजुटीने आणि सहकार्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळत असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.





