अचलपूरच्या ऐतिहासिक मोहल्ल्यांना मिळणार नवी ओळख!

आ.प्रवीण तायडे यांच्या नामांतर प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची दखल

महसूल व वन विभागाकडून पुढील कारवाईचे निर्देश

अचलपूर /20 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अचलपूर शहरातील ऐतिहासिक मोहल्ले आणि चौकांना महापुरुष, राष्ट्रपुरुष, संत-महात्मे तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा त्यांचा प्रस्ताव आता शासनाच्या पातळीवर चर्चेत आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाची दखल घेतली आहे. त्यामुळे अचलपूरच्या नामांतराच्या विषयाला आता प्रशासकीय गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अचलपूर शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. मात्र, शहरातील अनेक मोहल्ल्यांची नावे आजही जुन्या काळातील असून, त्यांना महापुरुषांची आणि देशासाठी अतुलनीय योगदान देणार्‍या थोर व्यक्तिमत्त्वांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या भावनेला सकारात्मक दिशा देत आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरातील 14 प्रमुख मोहल्ले व चौकांचे नामांतर करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतरही या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवत त्यांनी प्रत्यक्ष शासनदरबारी प्रस्ताव सादर केला.
या संदर्भात आ. तायडे यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अचलपूर शहरातील विविध भागांची नावे बदलण्याची मागणी केली होती. या प्रस्तावात जुन्या नावांऐवजी महापुरुष, राष्ट्रीय नेते आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. या मागणीची दखल घेत 19 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने अमरावती विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राची प्रत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.आ. तायडे यांनी प्रस्तावित केलेल्या नामांतरानुसार सुलतानपुरा मोहल्ल्याचे महावीर पेठ, अब्बासपुरा मोहल्ल्याचे अंबापेठ, बेगमपुरा मोहल्ल्याचे श्रीराम नगर, बीलनपुरा मोहल्ल्याचे वीर सावरकर नगर, मेहरापुरा मोहल्ल्याचे किसान पेठ, बागवानपुरा मोहल्ल्याचे गोकुळधाम, सरसमपुरा मोहल्ल्याचे भवानी नगर, बिलायतपुरा मोहल्ल्याचे छत्रपती संभाजी नगर, मुगलाईचे अयोध्या नगर, हिरापुराचे हनुमान नगर, कासदपुराचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नगर, वियाणीचे शहीद अब्दुल हमीद नगर, तसेच बुदेधा चौकाचे उस्ताद बिस्मिल्ला खान चौक आणि सराईपुराचे केशव नारायण नगर अशी नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
आता अमरावती विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासन या प्रस्तावाबाबत कोणती भूमिका घेते, तसेच अचलपूर नगरपरिषदेकडून पुढील प्रक्रिया किती तत्परतेने पूर्ण केली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Back to top button