धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 ठार
रविवार ठरला अपघातवार; विविध घटनात 35 जणांचा मृत्यू

क्रूझर उभ्या ट्रकला धडकल्याने दुर्घटना
खाटू श्यामजीहून परत येत असतांना राजस्थानात अपघात
कोटा /22 नोव्हेंबर : देशात रविवार 22 नोव्हेंबरची सकाळ अपघातांच्या घटनांनी सुरू झाली आहे. राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये सहा भीषण अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील खाटू श्याम येथे देवदर्शन करून परतणार्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा कोटामध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत पवार कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गांभिरीत्या जखमी आहेत. तर गुजरातच्या कच्छमध्ये झालेल्या भीषण अपघातात आर्मी कुटुंबातील 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. कुठे कार आणि ट्रकची धडक, तर कुठे वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील 9 जणांचा राजस्थानमधील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे 9 जण एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 या ठिकाणी रविवारी (22 नोव्हेंबर) मध्यरात्री 1 वाजताच्या हा सुमारास अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की यावेळी मदतकार्य करणार्या लोकांच्याही काळजाचा थरकाप उडाला. कोटा-उदयपूर हायवेवर शंभूपुरा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला क्रूझर व्हॅनने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. हे सर्व जण धुळ्यातीलराहणारे असून देवदर्शनाहून परतत असताना या भाविकांवर काळाने घातल्याचे सांगण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून मदतीसाठी लोक काही क्षणासाठी घाबरली. या घटनेची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेतील जखमींवर कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती देताना या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आम्ही खाटू श्यामला गेलो होतो आणि जयपूरमार्गे परतत होतो. आमच्या तीन गाड्या होत्या आणि आम्ही जयपूरच्या पुढे जेवणासाठी थांबलो होतो. जेवण झाल्यावर, ज्या गाडीला अपघात झाला ती गाडी आधी निघाली, तर आम्ही नंतर निघालो. वाटेत आम्हाला एक फोन आला की असा अपघात झाला आहे आणि आम्हाला लवकर पोहोचा असे सांगितले गेले. आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले होते. सध्या पाच-सहा लोक जखमी आहेत आणि बाकीच्यांचा मृत्यू झाला आहे. तर या कुटुंबातील अन्य एका सदस्याने प्रसार माध्यमांना माहिती दिली की, आम्ही ओंकारेश्वर, उज्जैन, पुष्कर, सांवरिया सेठ, सालासर बालाजी आणि खाटू श्यामला भेट दिली. 17 तारखेला आम्ही घरातून या देवदर्शनासाठी निघालो होतो. आम्ही शनिवारी (21 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास म्हणजेच संध्याकाळी 4 किंवा 4.30 च्या दरम्यान खाटू श्यामवरून निघालो. जयपूरच्या पुढे, आम्ही अल्पोपाहारासाठी थांबलो होतो. तेथून निघाल्यानंतर काही वेळाने आम्हाला फोन आला की अपघात झाला आहे, अशी माहिती अन्य एका सदस्याने दिली.





