मेळघाटातील साद्रावाडी आरोग्य केंद्रात निधीचा अपहार

मानव विकास आणि बालकांच्या शिबिरांच्या नावाखाली बनावट बिले

आदिवासींच्या आरोग्य निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार
चौकशी समितीसमोर बनावट बिलांचा पर्दाफाश उघड
बँक खात्याचा तपशील व बनावट बिलांचे पुरावे सादर
मुख्यालयात न राहणार्‍या कर्मचारी अधिकार्‍यांचे मेळघाटाकडे पूर्णतः दुर्लक्ष

अमरावती/22 नोव्हेंबर – मेळघाटातील धारणी तालुक्यात असलेल्या साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींच्या आरोग्यासाठी आलेल्या शासकीय निधीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मानव विकास आणि बालकांच्या शिबिरांच्या नावाखाली बनावट बिले जोडून लाखो रुपयांचा निधी उचलण्यात आल्याचा आरोप तक्रारदार शेख शहादत शेख खलील यांनी केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी या केंद्राची निवड आदर्श प्रकल्प म्हणून केली असतानाही यावर्षी येथे तब्बल जवळपास 25 मृत्यू झाले आहेत. या गंभीर प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र धारणी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्च 2024 ते मार्च 2025 या कालावधीत आदिवासी गर्भवती महिला आणि कुपोषित बालकांसाठी शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांच्या नावाखाली धारणी येथील लाईफ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आणि साई पेट्रोल पंपाची खोटी व बनावट बिले जोडून पंचायत समितीमधून शासकीय निधी काढण्यात आल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने माहितीच्या अधिकाराखाली बिलांच्या प्रती मागितल्या होत्या. मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करत उलट तक्रारदारालाच त्रास देण्यास सुरुवात झाली. चौकशी समितीने 18 नोव्हेंबर 2026 रोजी तक्रारदाराला बोलावून घेतले असता त्यांनी 2023 ते 2026 या काळातील साद्रावाडी केंद्राचे बँक खाते तपशील आणि बनावट बिलांचे पुरावे सादर केले आहेत.
या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यांनी स्वतः साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड सीईओ सत्यम गांधी यांनी आदर्श प्रकल्प म्हणून केली होती. तरीही या केंद्रात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. उलट या एकाच वर्षात येथे फक्त साद्रावाडी पीएचसीत 25 पेक्षा अधिक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयात माता मृत्यू आणि बालमृत्यू संदर्भात जनहित याचिका दाखल असतानाही जिल्ह्स आरोग्य अधिकारी गांभीर्याने पाहत नाही. धारणी तालुक्यातील तब्बल 80 टक्के आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहत नसून ते आपल्या सोयीनुसार ये-जा करतात. जिल्हा आरोग्य अधिकारी केवळ कागदोपत्री कामकाज करण्यात व्यस्त आहे.साद्रावाडी पीएससी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता साबळे ह्या कर्मचारी यांना कर्मचारी यांना अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
साद्रावाडी आरोग्य केंद्राच्या परिसरात सध्या रुग्णांपेक्षा गुरेढोरेच जास्त प्रमाणात वावरताना दिसतात. अस्वच्छता दिसून येत आहे. रुग्णवाहिका दुरुस्ती आणि इतर कामांबाबत वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनही अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. इतका मोठा प्रकार घडत असताना डॉ. साबळे हलगर्जीपणा का करत आहे? अशी मेळघाटातील जनता प्रश्न विचारत आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्यामुळे गोरगरीब आदिवासी जनतेला सेवा मिळत नसल्याचे असून सर्वसामान्य आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. साद्रावाडी येथील निष्काळजी डॉ. साबळे यांची तात्काळ उचलबांगडी करून त्याठिकाणी लवकरात लवकर जबाबदार वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करावी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

बनावट बिलांचा भांडाफोड करणार्‍या चालकावरच कारवाई
साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आर्थिक गैरव्यवहार आणि बनावट औषध तसेच इंधन बिलांची माहिती वाहन चालक शेख शहादत शेख खलील यांना झाली होती. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली याचा पाठपुरावा सुरू करताच हा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची भीती संबंधितांना वाटू लागली. हा प्रकार दडपण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता साबळे आणि डॉ. सागर वडस्कर या दोघांनी संगनमत करून चालकाविरुद्ध वरिष्ठांकडे खोटी तक्रार दिली. या खोट्या तक्रारीच्या आधारेच त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप चालकाने चौकशी समितीसमोर पुराव्यानिशी केला आहे.

महत्त्वाच्या मागण्या आणि प्रशासकीय अनागोंदी
साद्रावाडी केंद्रातील बनावट औषध आणि इंधन बिलांची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच मुख्यालयात गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन थांबवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. रुग्णवाहिका दुरुस्तीसह केंद्रातील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. वरिष्ठ अधिकार्‍यांनी केवळ वातानुकूलित कार्यालयात न बसता प्रत्यक्ष मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन विस्कळीत झालेली आरोग्य व्यवस्था सुधारावी अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button