संघ आणि भाजपाला भारतीय संस्कृतीची समज नाह
अर्धनारेश्वराचा फोटो पोस्ट करत राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली/22 नोव्हेंबर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’वर एलिफंटा लेण्यांमधील ’अर्धनारीश्वर’ मूर्तीचे छायाचित्र शेअर करत राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाला ’असभ्य, लालची, जातिवादी आणि पुरुषप्रधान मानसिकता असलेले’ म्हटले आहे.
भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे एकत्रित रूप दर्शवणारा हा फोटो शेअर करत राहुल गांधी यांनी लिहिले की, यांना भारताच्या आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांची कोणतीही समज नाही. आता राहुल गांधींच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राहुल गांधी यांची ही पोस्ट सोनिया गांधी यांच्या ’बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातीलवक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या (सोनिया आणि राजीव गांधी) नात्यातील स्नेहाची आठवण सांगताना म्हटले होते की, अनेकदा जेवताना पप्पा बसायचे आणि पप्पांच्या मांडीवर मम्मी बसलेली असायची. आपल्या मित्रांचे पालक अशा प्रकारे प्रेम व्यक्त करताना दिसत नाहीत याचे आपल्याला आश्चर्य वाटायचे, असेही ते म्हणाले होते. या विधानावरून भाजप नेते आणि समर्थकांनी सोशल मीडियावर राहुल गांधींवर जोरदार टीका आणि ट्रोलिंग केलं होतं.
यापूर्वी 17 नोव्हेंबर रोजीही राहुल गांधी यांनी 12 व्या शतकातील एका मंदिरातील मूर्तीचा फोटो शेअर केला होता, ज्यात देवी पार्वती भगवान शिवाच्या मांडीवर बसलेल्या दिसत होत्या. भीती, राग आणि द्वेषाने भाजप व आरएसएस समर्थकांच्या मनात एक जाळे विणले आहे, जे त्यांना प्रेम व्यक्त करण्यापासून रोखते. एक सच्चा हिंदू म्हणून त्यांना या जाळ्यातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. सत्यम शिवम सुंदरम, असे राहुल गांधी यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
आता ’अर्धनारीश्वर’चा फोटो शेअर करत राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएसच्या विचारसरणीवर थेट प्रहार केल्याने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे





