चांदूर बाजार तहसीलला कायमस्वरूपी अधिकार्याची प्रतीक्षा
प्रभारी कारभारामुळे सर्वसामान्यांची कामे पूर्णपणे रखडली

बदल्यांच्या सत्रामुळे प्रशासकीय शिस्तीचे वाजले तीनतेरा
चांदूर बाजार /22 नोव्हेंबर – तालुक्याचा कणा असलेल्या तहसील कार्यालयात मागील 6 वर्षांत तब्बल 18 वेळा तहसीलदारांची अदलाबदल झाल्याने कारभाराची पुरती वाट लागली आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने प्रभारींच्या भरोशावर सुरू असलेल्या कारभारात सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची कामे रखडली असून कर्मचार्यांवर वचक राहिला नाही. संजय गांधी निराधार योजनेचा विभागही प्रभारींवरच सुरू असून सत्ताधारी पक्षाचे 2 आ. असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप आहे.
तालुक्याच्या महसूल प्रशासनाचा मुख्य कणा असलेल्या चांदूर बाजार तहसील कार्यालयात अधिकार्यांच्या सततच्या बदल्यांचा सिलसिला सुरू आहे. 2020 पासून आजपर्यंत अवघ्या 6 वर्षांच्या काळात तब्बल 18 वेळा तहसीलदारांची बदली किंवा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. काही अधिकार्यांचा कार्यकाळ तर अवघ्या काही दिवसांपासून ते 1 किंवा 2 महिन्यांपर्यंतच राहिला. पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाची घडी बसवण्यापूर्वीच बदली होत असल्याने तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार मिळणार तरी कधी असा सवाल तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
तहसीलदार हे तालुक्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख पद आहे. जमीनविषयक प्रकरणे, शेतकर्यांचे प्रश्न, विविध शासकीय दाखले, नैसर्गिक आपत्तीतील मदत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी या पदावर असते. मात्र, वारंवार होणार्या बदल्यांमुळे प्रशासनात स्थिरता राहिली नसून प्रभारी अधिकार्यांच्या माध्यमातूनच कारभार हाकला जात आहे. निर्णय प्रक्रियेत सातत्य नसल्याने विविध दाखले आणि योजनांच्या लाभासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
वरिष्ठ अधिकार्यांचे स्थैर्य नसल्याने कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण आणि देखरेख कमकुवत झाली आहे. काही कर्मचार्यांकडून ओळखपत्र न वापरणे, वेळेत हजर न राहणे आणि परवानगीशिवाय कार्यालय सोडणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या बदल्यांमागे नेमकी प्रशासकीय अडचण आहे की राजकीय हस्तक्षेप असा प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ महसूल अधिकार्यांनी याबाबत स्पष्टता देण्याची गरज आहे.
तहसीलदार शिल्पा बोबडे, धीरज स्थूल यांच्यानंतर या कार्यालयात कोणत्याही अधिकार्याला दीर्घकाळ स्थिरपणे काम करण्याची संधी मिळाली नाही. केवळ तहसीलदारच नाही तर संजय गांधी निराधार योजनेचा विभागही अनेक वर्षांपासून प्रभारी अधिकार्यांच्या भरोशावर चालवला जात आहे. निराधार, वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांच्या योजनांशी संबंधित हा महत्त्वाचा विभाग पूर्णवेळ अधिकार्याविना कसा चालणार असा प्रश्न पडला आहे.
चांदूर बाजार तालुक्याला सत्ताधारी पक्षाचे 2 आ. लाभले आहेत. असे असतानाही तहसील कार्यालयातील या मूलभूत प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. दोन्ही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून नियमित तहसीलदाराची नियुक्ती करावी आणि निराधार विभागासाठी कायमस्वरूपी अधिकारी द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ महसूल विभाग या गंभीर प्रकाराची दखल घेऊन चांदूर बाजारला पूर्णवेळ तहसीलदार देणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी आमदार असूनही तहसील कारभार वार्यावर
चांदूर बाजार तालुक्याला सत्ताधारी पक्षाचे 2 आ. असतानाही तहसील कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 2020 पासून 6 वर्षांत 18 वेळा अधिकारी बदलले गेले. यात काही जण तर अवघ्या 1 ते 2 महिनेच टिकले. निराधार योजना विभागही वर्षानुवर्षे प्रभारींवरच सुरू असल्याने वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.





