कारवाई थंडावताच रस्त्यांवर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण

हटवलेल्या हातगाड्या काही तासांत दाखल

* महापालिकेच्या कारवाईनंतरही वाहतुकीचा प्रश्न कायम

अमरावती/22 नोव्हेंबर – शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असून, महापालिकेची कारवाई झाल्यानंतरही काही तासांत पुन्हा हातगाड्या उभ्या राहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असली तरी त्याचा कायमस्वरूपी परिणाम दिसत नसल्याने रस्त्यांवरील परिस्थिती पुन्हा जैसे थे होत आहे.
शहरातील विविध भागांत भाजीपाला विक्रेते, हातगाडीधारक आणि छोटे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला जागा अडवून व्यवसाय करतात. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून मार्ग काढताना अडचणी येतात, तर पादचार्‍यांनाही पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र, कारवाई पथक परतल्यानंतर विक्रेते पुन्हा त्याच जागी ठाण मांडतात. त्यामुळे वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक आणि गर्दीच्या रस्त्यांवर हा प्रकार अधिक जाणवत असून, नागरिकांनी नियमित कारवाईसोबतच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button