एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सुनील खराटे यांनी घेतली सदिच्छा भेट
अमरावतीमधील विविध प्रश्नांवर चर्चा

अमरावती/22 नोव्हेंबर – अमरावती जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सुनील खराटे यांनी आज मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमरावतीच्या विकासाशी संबंधित विविध विषय, प्रशासकीय कामकाज तसेच जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याबद्दल जनतेच्या वतीने सुनील खराटे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान मुंढे साहेबांनी विशेषतः अन्न सुरक्षा व अन्नविषयक जनजागृती या विषयावर काम करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी कोणते अन्न खावे, अन्नाचा दर्जा कसा असावा, अन्नपदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, स्वच्छ व सुरक्षित अन्न कसे ओळखावे, तसेच बाहेरचे अन्न सेवन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
केवळ अन्न उपलब्ध असणे महत्त्वाचे नसून ते सकस, स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी असणेही तितकेच आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.या सूचनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते सुनील खराटे यांनी अमरावती येथे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून अन्न सुरक्षा, सुरक्षित अन्नपदार्थांची निवड, अन्नाचा दर्जा आणि आरोग्यदायी आहार याविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.अन्न सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची बाब असून, या अभियानाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असे सुनील खराटे यांनी सांगितले.





