आजपासून महापालिका कर्मचार्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
प्रलंबित मागण्यांसाठी संघटनांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल

तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही ठोस निर्णय नाही
अमरावती /22 नोव्हेंबर- प्रलंबित मागण्यांकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचार्यांच्या सहनशीलतेचा बांध अखेर फुटला असून संघटनांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या 3 महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणताच ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचार्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा आक्रमक पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
अमरावती महापालिकेतील कामगार आणि कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अधिकार्यांकडून केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्ष कोणतीच हालचाल झाली नाही. यामुळे संतापलेल्या कर्मचारी संघटनांनी आता आरपारच्या लढाईचा निर्धार करत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची हमी मिळावी, रखडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि प्रशासनाने जबाबदारीने भूमिका घ्यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या आहेत. या बेमुदत आंदोलनामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घ्यावी आणि संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून यावर सन्मानजनक तोडगा काढावा, अशी अपेक्षा आता सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत मागण्यांवर लेखी आणि ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही कर्मचार्यांनी दिला आहे.
मागण्यांचा लढा तीव्र; प्रशासनासमोर पेच -महापालिका कर्मचार्यांच्या न्याय्य प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने संघटनांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचार्यांच्या मागण्यांची पूर्तता, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची हमी आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. या आंदोलनामुळे महापालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.





