240 हेक्टर जंगलावर अदानींचा विद्युत प्रकल्प; युवक काँग्रेसचे चिपको आंदोलन

‘आदिवासींचे हक्क डावलून जंगलाचा विनाश करणारा विकास नको’

’जंगलाचा विनाश करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही!’

एकीकडे व्याघ्र प्रकल्पाचे निर्बंध, दुसरीकडे वनजमिनीवर प्रकल्प कसा?
माती परीक्षणाच्या नावाखाली शंभराहून अधिक झाडांची कत्तल?
रोजगाराचे आश्वासन की केवळ आश्वासनांची खैरात?
आडनदीतील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी

चिखलदरा /22 नोव्हेंबर- जंगल, पर्यावरण आणि आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी युवक काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आडनदी येथे अदानी समूहाच्या वतीने तब्बल 240 हेक्टर वनजमिनीवर प्रस्तावित विद्युत प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याने, स्थानिक आदिवासी बांधवांसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आणि जंगल व झाडांचे संरक्षण करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ’चिपको आंदोलन’ करण्यात आले. झाडांना मिठी मारून ’जंगल वाचवा’ असा संदेश देत प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसच्या अमरावती जिल्हाध्यक्षांनी केले. यावेळी वनजमिनीवरील प्रस्तावित प्रकल्पाची परवानगी, स्थानिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि आदिवासींच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले.
अनेक वर्षांपासून व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली परिसरातील स्थानिक गावांना रस्ते, पूल, विहिरी, बोअरवेल आणि बंधारे यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी परवानगी मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजही परिसरातील तब्बल 22 गावांमध्ये वीज पोहोचलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सामान्य आदिवासी नागरिकांना त्यांच्या गावातील मूलभूत विकासकामांसाठी परवानग्या मिळत नसताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनजमिनीवर औद्योगिक विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी कशी दिली जाते? स्थानिकांच्या गरजांपेक्षा मोठ्या उद्योगांच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे का? असा सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.
प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या नावाखाली शंभराहून अधिक झाडे तोडण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत जंगलातील जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. वनक्षेत्रातील झाडांची तोड, प्रकल्पासाठी होणारे संभाव्य बदल आणि त्याचा स्थानिक पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत प्रशासनाने आपली स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पात आधुनिक आणि स्वयंचलित यंत्रणांचा वापर होणार असल्यास स्थानिक युवकांना किती रोजगार मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे रोजगाराचे स्वप्न दाखवायचे आणि दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या विस्थापनाची भीती निर्माण करायची, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे आदिवासींच्या पारंपरिक जीवनशैलीवर, उपजीविकेवर आणि नैसर्गिक संसाधनांवरील हक्कांवर गदा येण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकासाच्या नावाखाली आदिवासींचे हक्क हिरावून घेणे आणि जंगलाचा विनाश करणे आम्हाला मान्य नाही. स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसताना मोठ्या प्रकल्पांसाठी वनजमिनीचा वापर केला जात असेल, तर त्याबाबत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. आदिवासी समाजाचे हक्क, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांच्या भविष्याचा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये. आडनदी येथील प्रस्तावित विद्युत प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि प्रकल्प रद्द करण्याबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा.
’जंगल वाचवा, आदिवासींचे हक्क वाचवा’ हा संदेश देत युवक काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून आपला विरोध नोंदविला. आडनदी येथील प्रस्तावित विद्युत प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात रतिराम भुसुम, गणेश बेलसरे, प्रकाश झारखंडे, दयाराम मोरे, रामा बेलसरे, संजू भुसुम, दीपक बेलसरे, दशरथ बगाये, रामसिंग सराटे, चिंध्या हरसुले, हरिओम मोरे, राजेंद्र नागले, किसन अखंडे, गोविंद बेलसरे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आडनदीच्या जंगलाचा प्रश्न आता केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो आदिवासींचे अस्तित्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय असेल आणि प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विकासाच्या नावाखाली आदिवासींवर अन्याय नकोच -जंगलाचा विनाश करून होणारा कोणताही विकास आम्हाला मान्य नाही अशी ठाम भूमिका युवक काँग्रेसच्या नेतृत्वाने मांडली. स्थानिकांना साधी वीज आणि रस्ते मिळत नसताना बड्या उद्योगपतींसाठी जंगल तोडणे चुकीचे आहे. प्रशासनाने गावकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि आडनदीचा हा वीज प्रकल्प तात्काळ रद्द करावा अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button